# हिंगोलीतील राज्य राखीव पोलीस दलातील 6 जवानांना कोरोनाची लागण.

 

हिंगोली:  येथील राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, तर एकाचा सारीने मृत्यू झाला असून, त्याचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्ण हे सर्व हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 12 चे जवान असून यातील 1 जण हा मुंबई येथे तर 5 जण हे मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेले होते. या जवानांना येथील एसआरपीएफ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सद्यस्थीतीत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि एसआरपीएफ हॉस्पिटल तसेच वसमत, कळमनुरी, औंढा, आणि सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये आतापर्यंत 96 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 17 रुग्ण भरती असून, त्यांचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर 79 व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 102 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 92 रुग्ण भरती असून, 46 रुग्णांचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर 56 व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून, 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कळमनुरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 54 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. 6 रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. तर 48 व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. औंढा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 22 रुग्णांना दाखल करण्यात आले असून, हे सर्व रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 20 रुग्णांचा स्वॅब अहवाल प्रलंबित असून 2 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आतापर्यंत 38 रुग्णांना दाखल करण्यात आले असून, या 38 रुग्णांचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर हिंगोली येथील एसआरपीएफ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 194 रुग्णांना दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 93 रुग्णांचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर 6 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह’ आला असून 95 व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 506 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 417 रुग्ण भरती असून, 220 रुग्णांचा स्वॅब अहवाल प्रलंबित आहे. तर 6 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून 280 व्यक्तींचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. 89 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *