अंबाजोगाई: बुट्टेनाथ दरी येथे
अवैधरित्या गावठी मद्य निर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच गस्तीवर असताना शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 19 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल केले. तसेच हस्तगत करण्यात आलेली गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड यांनी दिली.
बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात. आतापर्यंत लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाअंतर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे.
सध्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक निमित्ताने आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत बुट्टेनाथ दरी या ठिकाणी धाड टाकून एकूण 3 गुन्हे नोंदवले. या ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत दोन्ही ठिकाणी एकूण गुन्हे 3 तर बेवारस गुन्हे 3 नोंदविण्यात आले आहेत. या धाडीत 5400 लिटर रसायन, 200 लिटरचे 27 बॅरल व 6 टोपली असा मुद्देमाल एकूण 1 लाख 19 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुट्टेनाथ दरी या ठिकाणी झालेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर. गायकवाड, जवान बी.के. पाटील, वाहनचालक के.एन. डुकरे यांनी सहभाग घेतला.