पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने २८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा एक ते २२ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन होते. या वेळापत्रकावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या विचारात घेऊन राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे संभाव्य वेळापत्रक आणि अंतिम वेळापत्रक यात थोडाफार बदल झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंडळाच्या अंतिम वेळापत्रकानुसार बारावीच्या सर्वसाधारण आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची परीक्षा २१ फेब्रवारी ते १९ मार्च या कालावधीत होणार आहे. याच कालावधीत व्यवसाय अभ्यासक्रमाचीही परीक्षा होणार आहे. तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च या दरम्यान होणार आहे. बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक गुरुवारपासून राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.