मुंबई: राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शुक्रवारी दिली.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.
राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ९३ (मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबिवली ७, भिवंडी १), नाशिक- २४ (जळगाव १४, नाशिक ३, मालेगाव ८), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), कोल्हापूर- ५ (रत्नागिरी ५) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), औरंगाबाद-१.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहेत. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव -१३, ठाणे ३०, कल्याण डोंबिवली -७, मालेगाव -८, रत्नागिरी -५, पुणे- ३, भिवंडी -१, सोलापूर -२, नाशिक २ असे मृत्यू आहेत.