औरंगाबाद : शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले.