तब्बल 22 तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत
पुणे: नऱ्हे परिसरात एकीकडे रस्त्याच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे सत्र सुरु आहे. त्यातच पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाचे काम करताना गुरुवारी (दि. 15) रात्री 10 वाजता जेसीबीच्या खोदकामात सात लघुदाब भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे नऱ्हेमधील नवदीप सोसायटी व परिसरातील सुमारे 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. क्वीन्स गार्डन या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीमधील वीजपुरवठा गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास खंडित झाला होता तो तब्बल 22 तासानंतर म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पूर्ववत झाला.
दरम्यान, पर्यायी व्यवस्थेतून सुमारे एक हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल. तर उर्वरित 500 ग्राहकांचा वीजपुरवठा तुटलेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे सुमारे 310 रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता तर काहींचा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ 8 रोहित्र वगळता उर्वरित सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरु झाला. सदाशिव पेठमधील पावसाच्या पाण्याने भूमिगत वाहिनी नादुरुस्त झाल्याने 4 रोहित्र बंद पडली होती. त्याठिकाणी आज 60 मीटर नवीन वीजवाहिनी टाकण्यात आली व वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. सातारा रोडवरील जांभुळवाडी येथे एक रोहित्र जमीनदोस्त झाले होते. ते उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. क्वीन्स गार्डनमधील भूमिगत वाहिनी नादुरुस्त झाल्याने एका रोहित्राचा वीजपुरवठा बंद होता. तो सायंकाळी सुरु करण्यात आला आहे. याशिवाय आकुर्डी परिसरातील दोन रोहित्रांमध्ये गंभीर बिघाड झाल्याने हवालदारवस्ती, अजिंठानगर, संभाजीनगर परिसरातील सुमारे 400 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. या दोन्ही रोहित्रांच्या दुरुस्तीचे काम सायंकाळी पूर्णत्वाकडे होते.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी अजूनही वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र, तेथील वीजपुरवठा प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. काही सोसायटींच्या पार्किंगमध्ये किंवा रोहित्रांच्या बंद खोलीत पाणी शिरल्याने पाण्याचा उपसा करणे, वीजयंत्रणा कोरडी करणे तसेच पाण्यात असलेल्या भूमिगत वाहिन्यांची तपासणी व दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्या संबंधीच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम जलदगतीने सुरु आहे.
वीजपुरवठा खंडित असल्याच्या तक्रारी करण्यासाठी महावितरणचे 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी स्वीकारल्या जातात. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉलदिल्यास किंवा मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.