जालना: मेडिकल बिल मंजूरीसाठी 2000 रू. लाच घेताना रमेश आरोपी रामधन राठोड, वय 48 वर्षे, पद – आरोग्य सहायक, वर्ग – 3, नेमणूक – आरोग्य विभाग, जि. प. कार्यालय, जालना यास येथे रंगेहाथ पकडण्यात आले.
थोडक्यात हकिकत: यातील तक्रारदार हे आरोग्य विभागात नोकरीस असून त्यांची बदली जि.प. नांदेड येथे झालेली आहे. तक्रारदार यांनी दि.19/01/2023 रोजी मेडिकल बिल रू. 29362 व 61859 रू. असे एकूण 91,221 रू. ची फाईल आरोग्य विभागात दिलेली होती. त्यावेळी तक्रारदार यांचेकडून आरोपी राठोड याने व सुधाकर मांटे यांनी 5000 रू. घेतले होते परंतु पैसे घेऊन पण मेडिकल बिल मंजूर केले नव्हते. या दरम्यान तक्रारदार यांची जि. प. नांदेड येथे बदली झाली. त्यामुळे मेडिकल बिल मंजूर नाही याबाबत किमान NOC तरी द्यावी म्हणून दि.12/07/2023 रोजी NOC देण्याबाबत लेखी अर्ज केलेला होता. आज गुरुवारी दिलेल्या तक्रारीनुसार लाच पडताळणी कारवाई दरम्यान सदर NOC साठी आरोपी राठोड याने श्रीमती सरोज बिडला मॅडम कनिष्ठ सहायक यांचे नावाने 2000 रू. लाचेची मागणी पंचा समक्ष करून स्वीकारण्याचे मान्य केले व त्यावरून सापळा कारवाई दरम्यान आज आरोपी राठोड याला पंचासमक्ष 2000 रू. लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपी राठोड यांचेकडून 2,000 रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाणे कदिम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई सापळा अधिकारी किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा पथक पोलीस अमलदार गणेश बुजडे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, चालक कापसे यांच्या पथकाने केली.