शासनाच्या दुर्लक्षामुळेच मृत्यूचे तांडव माजी अभ्यागत मंडळाचा आरोप
नांदेड: नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची भव्य वास्तू केवळ आता शोभेचे बाहुली बनली आहे. या वास्तूमध्ये घाणीचे साम्राज्य असून औषध पुरवठा, नर्सेस व डॉक्टरांचा स्टॉफ अत्यंत कमी आहे. त्यामुळे रुग्णांची सुश्रुषा नीटनेटकी होत नाही. दुर्देवाने या समस्यांची परिणिती म्हणून 24 तासात 24 रुग्णांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये दोन दिवसांच्या आतील 12 बालकांचा समावेश आहे. नांदेडमध्ये झालेल्या मृत्यूचे हे तांडव शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाल्याचा गंभीर आरोप या भागातील स्थानिक आमदार व अभ्यागत मंडळाचे माजी अध्यक्ष आ.मोहन हंबर्डे यांच्यासह माजी सदस्य संतोष पांडागळे, डॉ.करुणा जमदाडे, शेख लतिफ यांनी केला आहे.
24 तासात 24 रुग्ण मृत्यू झाल्याची घटना समजताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रुग्णालयास भेट दिली. महाविद्यालयातील भयाण वास्तवाची यानिमित्ताने माहिती उजेडात आली. वारंवार सांगूनसुध्दा शासनाकडून या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास आर्थिक मदत केल्या जात नाही. सिटीस्कॅन यासारख्या करोडो रुपये खर्च करुन खरेदी करण्यात आलेल्या अनेक मशिन केवळ शासनाने एएमसी अर्थात वार्षिक देखभाल निधी न दिल्यामुळे धूळ खात पडून आहेत. या विषयी शासनास काही गांभीर्य नाही. मागील दीड वर्षांपासून या महाविद्यालयास पूर्ण वेळ अधिष्ठाता दिला नाही. प्रभारी राज सुरु आहे. प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नर्सेसचा तुटवडा आहे. यामुळेच या रुग्णालयातील रुग्णसेवा कमालीची ढासळल्याचा आरोप आ.मोहन हंबर्डे, संतोष पांडागळे, डॉ.करुणा जमदाडे, शेख लतिफ यांनी केला आहे. अभ्यागत मंडळ निर्मितीनंतर कोविडच्या काळात केवळ दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये एकाही बाबींची पूर्तता झाली नाही. त्यानंतर सत्तांतर झाले. परंतु नवीन अभ्यागत मंडळ दिले नाही. किंवा जुन्या अभ्यागत मंडळ सदस्यांना हे मंडळ अस्तित्वात आहे किंवा नाही याची माहिती देखील दिली नसल्याचा खेद व्यक्त केला. आ.मोहन हंबर्डे यांनी रुग्णालयातील स्टॉफ, औषध पुरवठा, स्वच्छता या संदर्भात पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना कमीत कमी 25 पत्र दिली. पालकमंत्र्यासमोर सार्वजनिक भाषणामध्ये महाविद्यालयाच्या सुविधांकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली. परंतु असे काहीच घडत नसल्याचा आरोप आ.मोहन हंबर्डे यांनी केला.
त्वरित निर्णय घेऊन ७० गंभीर रुग्णांना वाचवा: अशोक चव्हाण
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी तातडीने सदर रुग्णालय गाठून प्रभारी अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडून माहिती घेतली. येथील परिचारिकांच्या बदल्या झाल्या. मात्र, रिक्त झालेल्या पदांवर नवीन नेमणूक झाली नाही. डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. डीपीडीसीतून मिळणाऱ्या निधीला तांत्रिक मान्यता न मिळाल्याने रूग्णालयासमोर आर्थिक संकट आहे. सीटीस्कॅन व इतर उपकरणांच्या देखभालीसाठी केलेल्या कराराचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे संबंधित सेवा पुरवठादाराने देखभाल थांबवली असून, येथील अनेक उपकरणे बंद पडली आहेत. रुग्णालयाची क्षमता ५०० रूग्णांची असताना आज तिथे सुमारे १ हजार २०० रुग्ण दाखल आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार पाठविणार असल्याची माहिती दिली आहे. येथील असुविधा व अडचणींबाबत माझे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मी त्यांना केली आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज मी कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती दोष कुणाचा हे स्पष्ट होईल. परंतु, राज्य सरकारने तातडीने रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.