पीएमसी बँक घोटाळ्याशी भाजपचे लागेबांधे
मुंबईः देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात २५ हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाला, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमांइड राकेश वाधवान याच्याशी भाजपचे थेट आर्थिक संबंध असून त्याच्या खात्यातून भाजपला २० कोटी रुपये निवडणूक निधी दिला गेला. भाजपचे किरिट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून रोख रक्कम आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन हडपली. हिम्मत असेल तर किरिट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा, असे आव्हानच राऊत यांनी दिले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सबंध देशाचे लक्ष लागले होते. सर्व नेते आजची पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचीही फोन आला. महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता आमच्यासोबत आहे. कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे, असे सुरूवातीलाच राऊत यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. या सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाला. अमोल काळे कोण? विजय ढवांगळे कुठे आहे? कंत्राटाशिवाय त्यांना कामे कशी दिली? असे सवाल करत या घोटाळ्याची कागदपत्रे मी ईडीला देतो. हिम्मत असेल तर त्यांनी कारवाई करावी. हरियाणामधील एक दूधवाला आहे. भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात हा दूधवाला हजार कोटींचा मालक कसा झाला? जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते, तेव्हा मंत्र्यांच्या घरी त्याचे येणे जाणे होते. त्याच्याकडे कुणाचा पैसा जायचा? हे मनी लाँडरिंग कुणी केले?, असा सवालही राऊत यांनी केला.
पीएमसी बँक घोटाळ्यातील पैसे आम्ही वापरतो, असा भाजपचे लोक आरोप करतात. वस्तुतः पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाइंड राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपला २० कोटी रुपये निवडणूक निधी दिला गेला. निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे? किरिट सोमय्यांची आहे. तो राकेश वाधवानीचा पार्टनर आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील पैश्यातून किरिट सोमय्यांनी वसईत हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून ८० ते १०० कोटी रुपयांची कॅश हडपली आणि ४०० कोटींची जमीन दुसऱ्याच्या नावावर ४.५ कोटी रुपयांत घेतली. राकेश वाधवानकडून १२ हजार कोटींची जमीन मोहीत कंम्बोजने अवघ्या १०० कोटी रुपयांत घेतली, असेही राऊत म्हणाले.
जितेंद्र नवलानी कोण?: ईडीवाले ऐका. या माझ्या घरी. मी लढणारा माणूस आहे. जितेंद्र नवलानी कोण आहेत? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ईडीच्या लोकांचे घसे सुकले असतील. चार महिन्यांपासून मुंबईतील बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली चालू आहे. ईडीलाही हे माहीत आहे. सर्व डेटा माझ्याकडे आहे. मी मोदी आणि अमित शाहांना याबाबत लिहिणार आहे. ७० बिल्डर्सकडून वसुली करण्यात आली आहे. फरीद शमाम, रोमी हे कोणाचे एजंट आहेत?, अशा चार एजंटांनी बिल्डर्सकडून ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत, असेही राऊत म्हणाले.
भाजप मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटींचे कार्पेटः एक वर्षापूर्वी मुंबईत वनमंत्री असलेल्या भाजप नेत्याच्या मुलीचे लग्न झाले. आम्ही काही बोललो का? ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी लग्नाचा सेट जंगलाचा केला. त्याला जंगलाचा फिल यावा म्हणून त्यांनी जे कार्पेट टाकले त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. ईडीला हे दिसले नाही का? आम्ही म्हणतो घरातील लग्न आहे, घरात शिरायचे नाही. पण आमच्या घुरात तुम्ही अशा पद्धतीने शिरता?, असा सवाल त्यांनी केला.
राज्यात केंद्रीय पोलीस दल आणण्याची धमकीः भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मला दिल्लीत भेटून सरकारच्या प्रवाहापासून दूर होण्याचा सल्ला दिला. तुम्ही सरकारमधून बाहेर पडा. नाहीतर ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून तुम्हाला त्रास दिला जाईल, असे भाजपच्या नेत्यांनी मला सांगितले होते. आम्ही पवार कुटुंबावरही ईडीच्या माध्यमातून कारवाई करणार आहोत, असा दावाही त्या नेत्यांनी केला आणि त्यानंतर पवार कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर ईडीची कारवाई सुरू झाली. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर राज्यात ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले होते. पण ईडी तर आहेच, आम्ही केंद्रीय पोलीस दल राज्यात आणू, असे भाजप नेते मला म्हणाले, असा खळबळजनक दावाही राऊत यांनी केला.
ते साडेतीन लोक कोण?, उद्यापासून कळेलः कितीही धमकवा. महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणारच. हा फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या काळात आणखी कागदपत्रे, आणखी व्हिडीओ समोर येतील. उद्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळेल. जसजसे आत घुसू भाजपला कळत जाईल. आता कोणी दिल्लीला गेले आहे. दिल्लीला जा नाहीतर बायडेनकडे जा… आम्ही घाबरत नाही, असेही राऊत म्हणाले. काहीही करा आम्ही झुकणार नाही. आम्ही तुम्हालच झुकवू, असेही राऊत म्हणाले.