# राज्यात 27 टक्के पेरण्या; हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी.

मुंबई: राज्यात खरिपाच्या सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून राज्यात पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. कोकण विभाग वगळता अन्यत्र राज्यभर तुरळक पाऊस होत असून भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन आणि जमीनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या 22 जून 2021च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पूर्वीच कृषी विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला दिला होता. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील उपलब्ध ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले जात आहे.

राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जूनपर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *