नांदेडचे सहा.कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांच्या पुढाकाराने एकूण 21 लाख 15 हजार रुपयांची आर्थिक मदत
नांदेड: कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे दिर्घकाळ लॉकडाऊन घोषित झाला. हातावर पोट असणार्या माथाडी कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या कामगारांना माथाडी बोर्डाच्या राखीव निधीतून आर्थिक मदत करण्याचा सहायक कामगार आयुक्त तथा बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन सय्यद यांनी निर्णय घेवून जिल्हाधिकार्यांच्या हस्ते एकूण 21 लाख 15 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या माथाडी कामगारांना मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यात कामगार, कष्टकर्यांचे अतोनात हाल झाले. माथाडी कामगारांचे रोजंदारीवर सर्व कुटुंबियाचा उदरनिर्वाह असतो. त्यामुळे माथाडी कामगारांच्या कुटुंबियांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत माथाडी कामगारांना मदतीचा निर्णय झाला होता. नांदेड जिल्हा माथाडी बोर्डाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त मोहसीन सय्यद यांनी स्थानिक पातळीवर असलेल्या राखीव निधीतून माथाडी कामगारांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला होता. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते या मदतीचा प्रातिनिधीक धनादेश नांदेड हमाल माथाडी हातगाडा संघटनेचे सचिव भुजंग कसबे, विनायक सुर्यवंशी, शिवाजी दराडे, ट्रान्सपोर्ट डॉक वर्कर्स युनियनचे सहसचिव शिलन सोनकांबळे, मैनोद्दीन पठाण, प्रतापसिंह ठाकूर, प्रभाकर वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त मोसीन सय्यद, मंडळाचे सचिव अविनाश देशमुख, निरीक्षक डी.पी. फुले, व्ही.एच. पाटील, एम.एम. नाईक आदी उपस्थित होते.