# राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज; आज १६०६ नवीन नोंद, राज्यात एकूण ३०७०६ रुग्ण.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज शनिवारी सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील ४१, पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर सोलापूर शहरामध्ये १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *