# राज्यात कोरोनाचे आज २३४७ नवीन रुग्ण; एकूण ३३0५३ रूग्ण, ६०० जण बरे झाल्याने डिस्चार्ज.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ७३ हजार २३९ नमुन्यांपैकी २ लाख ४० हजार १८६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर ३३ हजार ५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ४८ हजार ५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवड्यात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.
राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून, एकूण संख्या ११९८ झाली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १, लातूरमध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये (६५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *