नवी दिल्ली: आतापर्यंत देशभरात कोरोनाचे चे 9950 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 1061 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याचे आढळले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 26.65 टक्के इतका आहे. सध्या देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 37,336 इतकी आहे. कालपासून देशात कोरोनाच्या 2293 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
कोवीड-19 या साथीच्या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.
PPE सूट्सचा (म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट–शारीरिक संरक्षक परिधानाचा) योग्य वापर कसा करावा याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याआधी मंत्रालयाने, “पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंटचा सुसंगत वापर” या नावाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचाच हा पुढचा भाग आहे.