# राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर; आतापर्यंत ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले.

 

मुंबई: राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६० (मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १), नाशिक- ८ (धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदूरबार १), पुणे- २९ (पुणे १९, सोलापूर १०), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-१७ (औरंगाबाद मनपा १६, जालना १), लातूर- १ (उस्मानाबाद १), अकोला-२ (अकोला २), इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०, सोलापूर -१०, औरंगाबाद -६, नवी मुंबई -३, धुळे -३, जळगाव -२, कोल्हापूर -२, ठाणे २, अहमदनगर -१, अकोला १, नंदूरबार -१, पुणे १, उल्हासनगर १, वसई विरार -१ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *