पुणे: लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येरवडा परिसरात छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व बनावट यूएस डाॅलर जप्त केले आहेत. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी लष्कराशी संबंधित आहे. उर्वरित पाचजण हवाल्याचा धंदा करणारे आहेत.
जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 43.4 कोटी रूपयांच्या बनावट नोटा आणि 4.2 कोटी मूल्य असलेले यूएस डाॅलर आहेत. या बनावट नोटांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. यातील बहुतांश नोटांवर, चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडिया असे लिहिलेले आहे.
याप्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील बद्रीनारायण सारडा, रितेश रत्नाकर, तुफेल अहमद महंमद इसाक खान, अब्दुल गणी रहेमतुल्ला खान, अब्दुल रहेमान अब्दुल गणीखान या सहाजणांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत पैसे मोजण्याचे काम सुरु होते. विमाननगर येथील संजय पार्क याठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि गुन्हे शाखा यांना विमाननगर भागातील संजय पार्क येथे बनावट नोटांचा व्यापार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात त्यांना मोठ्या संख्येने बनावट नोटा आढळून आल्या. यामध्ये दोन हजार रुपयांच्या सर्वाधिक नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा देखील यात समावेश आहे. भारतीय चलनावरोबरच बनावट विदेशी चलनाचा देखील यात समावेश आहे. मोठ्या प्रमाणात फेक डॉलर देखील या कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत.
बनावट नोटांचा व्यापार करणारे आरोपी यांचा व्यवसाय हवाल्याचा आहे. तर यातील एकजण लष्कराच्या सेवेत आहे. पकडण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी दोनजण पुणे तर उर्वरित चारजण मुंबईतील आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.