# राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून.

मुंबई: राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या. शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजन 2025 असे सादरीकरण आज शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

राज्यातील शाळांच्या गुणावत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, परीक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा: मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करित असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता हा विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे.आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी  किती निधी लागेल याप्रमाणे तरतूदीची मागणी करण्यात यावी.
राज्यातील शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये फेजवाईज इंटरनेट सुविधा उपलब्ध  करून द्यावी. मुलांना सध्याच्या शिक्षणपद्धती बरोबरच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का या पद्धतीने शाळेची रचना करावी. यासाठी बोलक्या भिंती यासारखे उपक्रम राबवता येतील का हे सुध्दा पाहण्यात यावे, शाळेची इमारत ही शिक्षणाचे माध्यम व्हावे यादृष्टीने  पथदर्शी उपक्रम राबवावेत असेही श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजन नुसार काम करताना तातडीने हाती घ्यावयाची कामे आणि दीर्घकालीन कामे याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंपन्याचा शोध घेऊन सामाजिक उत्तरदायित्व निधी अंतर्गत शालेय विकासासाठी कोणते उपक्रम हाती घेता  येतील आणि त्यांना शासनाबरोबर कसे जोडता येईल यासाठी विभागाने प्रयत्न करावा असेही श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शिक्षणाचे सर्वत्रिकारण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये  भरीव वाढ करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखणे, 5 हजार आदर्श शाळांची निर्मिती करणे, शिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025  आज शालेय शिक्षण विभागामार्फत आज  सादर करण्यात आले. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी, शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासन निर्णय, कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे, गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *