बुधवारी निकाल; रिक्त जागांची आकडेवारी पुढील आठवड्यात
औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेली ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट (पेट दुसरा पेपर) ६ हजार २७३ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने दिली, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.
एकूण ४५ विषयांसाठी शनिवारी (दि.१३) पेट घेण्यात आली. पेट ऑनलाईन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला. पहिल्या पेपरला ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘चा ५० गुणांचा पहिला पेपर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये सहा हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३ मार्च रोजी सकाळी १० ते १ दरम्यान दुसरा पेपर घेण्यात आला. पेट च्या दुसऱ्या पेपरला सहा हजार ३८३ विद्यार्थ्यांपैकी केवळ एकशे दहा जण अनुपस्थित होते. ऑनलाइन परिक्षेत विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण आल्यास अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. वात्मिक सरवदे व उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी त्याचे निवारण केले. पहिल्या पेपर प्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकावर परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना होती. या परीक्षेसाठी शंभर प्रश्न व ९० मिनिटांचा वेळ देण्यात आला. शंभर गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. १७ मार्च रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २० मार्च रोजी लागेल. त्यानंतर प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
पुढील आठवड्यात रिक्त जागा, गाईडची माहिती: पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान पीएच.डीसाठी ऑनलाईन नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४५ विषयात ‘पेट‘ घेण्यात आली. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही २२ मार्चला प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘पेट‘चा दुसरा टप्पा १३ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी‘ मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. २२ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर ८ एप्रिलपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या आरआरसी बैठक होणार आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.