औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 939 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 155 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2430 कोरोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासात घाटीत 6 व खाजगी रूग्णालयात 1 असे एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 128 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या राधास्वामी कॉलनीतील 45 वर्षीय पुरूष रुग्णाचा 10 जून रोजी रात्री 7.30 वा., कटकट गेट, नेहरू नगरातील 57 वर्षीय स्त्री रुग्णाचा रात्री नऊ वाजता, नूतन कॉलनीतील 40 वर्षीय पुरूष आणि त्रिमूर्ती नगरातील 67 वर्षीय पुरूष रुग्णांचा रात्री 11.30 वा, तर आज 11 जून रोजी पहाटे 2.45 वाजता नागसेन नगरातील 60 वर्षीय पुरूष, पहाटे 4.30 वाजता रोशन गेट येथील 60 वर्षीय स्त्री रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात आज पहाटे दोन वाजता रोशन गेट येथील 79 वर्षीय कोरोनाबाधित असलेल्या पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 98, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 29, मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 128 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.