# वैद्यकीय प्रवेशातील ७०/३० कोटा पध्दत रद्द होणार!

मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय दूर होणार

मुंबई: वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पध्दत रद्द करून मराठवाडा व विदर्भातील वैद्यकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील एमबीबीएस सह वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०/३० कोटा पद्धत राज्य सरकार रद्द करणार आहे. याबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

भाजप सेना युती सरकारच्या काळात वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण लागू असताना, पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची जाचक अट लावण्यात आली, त्यामुळे मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. मराठवाड्यात केवळ ६ तर विदर्भात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत; अशा परिस्थितीत ७०:३० कोटा निर्माण करून प्रादेशिक आरक्षण लागू झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षणास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विशेष करून मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांना बसत होता.

याबाबत विधानपरिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सातत्याने आवाज उठवत ७०:३० कोटा पद्धत रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर धनंजय मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ.सतीश चव्हाण यांनी वेळोवेळी सरकार दरबारी मागणी तसेच पाठपुरावा केला होता. तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, विभागाचे प्रधान सचिव तसेच राज्यपालांकडे अनेक बैठका व निवेदनांचे सत्र यासाठी पार पडले होते.

या सर्व बाबींचा परिपाक म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धतीस रद्द करत अनेक वर्षांच्या या मागणीला हिरवा कंदील दिल्याचे समजते, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. येत्या एक दोन दिवसातच याबाबतची अधिकृत घोषणा होऊन शासन निर्णय जाहीर करण्यात येईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

राजकिशोर मोदी यांचाही पाठपुरावा:
यासंदर्भात बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०/३० कोटा पद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. दरम्यान, आजच मंत्री अमित देशमुख यांच्याशी बोलणे झाले असून, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ७०:३० कोटा पद्धत रद्द होणार असल्याच्या मागणीला यश येणार असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *