मृत्यूदर वाढल्याने अंबाजोगाईतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात गेल्या ३७ दिवसांमध्ये ८६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अनेक रुग्ण पन्नाशीच्या आतले आहेत. मृत्यूदरात दररोज वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल ६५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १ ते ६ सप्टेंबर या सहा दिवसांमध्ये २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्वाराती प्रशासनाकडून सांगण्यात आले. नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ.शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णांवर उपचार केले जात आहेत. रूग्णालयाची संपूर्ण जिम्मेदारी यांच्यावर आहे. सद्य परिस्थितीला स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयांमध्ये प्रतिदिवस दोनहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक असल्याने अंबाजोगाई येथील रुग्णालयांमध्ये आणखी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे.
औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणांहून अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर रूग्णांवरती उपचार करण्यासाठी पाठविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून आणि स्वारातीमधील डॉक्टरांकडूनही करण्यात येत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसने देशभरामध्ये धुमाकूळ घातला आहे. राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर ही शहरे रेड झोन म्हणून ओळखली जात होती. या शहरांमध्ये मृत्यूदर सुरुवातीस मोठ्या प्रमाणावर होता. काही कालावधीनंतर या रेड झोन शहरांमधील मृत्यूदर खूप कमी झाला. इतर शहरांच्या तुलनेत अंबाजोगाई येथील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी रूग्णालय प्रशासनाकडून मिळणार्या सुविधा आणि उपचाराबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. रुग्णांवर उपचार करत असताना मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याच्याही तक्रारी रुग्ण करत आहेत. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय वाढत चाललेला मृत्यूदर कमी होणार नाही. पुढील काळात कोरोना व्हायरसचे आणखी रूग्ण वाढतील असा अंदाज डब्ल्यूएचओ संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. अंबाजोगाई येथील रुग्णालयातील उपचाराबाबत वेळीच दखल न घेतल्यास मृत्यूदर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजार अंगावर काढल्याने वाढत जातो:
रुग्णांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्याबरोबर रुग्णालयात तपासणी करणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्याने वाढत जातो. कोरोनाबाधित मृत्यू झालेले बरेच रूग्ण साठहून अधिक वयाचे आहेत. त्यांना पूर्वीचे आजार जसे शुगर, बीपी, कीडनीचे आजार यासारखे गंभीर आजार होते. अनेक रुग्ण खूप उशिरा दवाखान्यात दाखल होतात. परिणामी कोरोनामुळे मृत्यू ओढवला जाऊ शकतो. मृत्यूदर कमी करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहोत, अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.शिवाजी सुक्रे यांनी दिली.