फडणवीसांच्या १२५ तासांचे रेकॉर्डिंग स्टिंग ऑपरेशनचा शरद पवारांकडून समाचार

मुंबई: महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला. सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डिंग होतेय, ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे, असे पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत यश येत नसल्यामुळे फडणवीस यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचेही पवार म्हणाले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप करून खळबळ उडवून दिली. राज्यातील भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत त्यांनी पुरावा म्हणून १२५ तासांचे रेकॉर्डिंग असलेला पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. हे १२५ तासांचे रेकॉर्डिंग स्टिंग ऑपरेशन करून केल्याचे फडणवीस म्हणाले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये शरद पवारांचेही नाव आहे. त्याबाबत आज मुंबईत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीत फडणवीसांच्या आरोपांचा समाचार घेतला.

ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्या खोलात मी गेलो नाही. परंतु शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संबंधित १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात फडवणीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले, ही कौतुकास्पद बाब आहे. १२५ तासांचे रेकॉर्डिंग करायचे याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल, याचा हिशेब केला तर ही बाब कौतुकास्पदच म्हटली पाहिजे. १२५ तास रेकॉर्डिंग करण्याचे काम खरेच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी फक्त भारत सरकारकडेच आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तासन तास जे काही रेकॉर्ड करण्यात ते यशस्वी झाले, हे खरे आहे की नाही, हे सिद्ध झाले पाहिजे, असे पवार म्हणाले.

माझे नाव अप्रत्यक्षपणे घेतले गेले, पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करून पवार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता तपासून पाहील. त्यात माझेही नाव घेतलेले दिसते. पण माझे या संबंधात कुणाशी काही बोलणे व्हायचं कारण नाही. कधी काही वर्ष-सहा महिन्यांनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना ती कळवली. त्यात सत्यता किती हे तुम्ही पहा, तुमच्या सहकाऱ्याबाबतची तक्रार आहे, असे मी त्यांना सांगितले होते, असेही पवार म्हणाले.

सरकार पाच वर्षे टिकेल: राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे स्वच्छ आणि स्पष्ट बहुमत आहे. बहुमत असल्यामुळे चिंतेचे कारण नाही. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही खरी गोष्ट आहे. सत्ताधाऱ्यांना नाउमेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा सत्ता कशी मिळवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्या प्रयत्नांना कुणाचाही प्रतिसाद मिळणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुणीही त्या प्रयत्नांना बळी पडणार नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे पवार यांनी ठामपणे सांगितले.

राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईक, स्वकियांवर धाडसत्र सुरू आहे. एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे. याचा अर्थ केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कशाप्रकारे सुरू आहे, याचे अनिल देशमुख हे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांच्या घरावर ९० छापे टाकले. यापैकी ५० छापे ईडी, २० छापे सीबीआय आणि २० छापे प्राप्तिकर विभागाकडून टाकण्यात आले. २०० लोकांचे जवाब नोंदवले. एकाच व्यक्तीच्या घरावर ९० छापे पडण्याचा प्रकार मी यापूर्वी कधी पाहिला नाही आणि प्रशासनात काम करत असताना असला तपासही मी कधी पाहिला नाही, असा खोचक टोलाही पवार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *