औरंगाबाद: दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा परिसरात सुशोभित फुलांची बाग (गार्डन) विकसीत करून हा परिसर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. ही माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे (एएसआय) अधीक्षक पुरातत्व विद डाॅ. मिलन कुमार चावले यांनी येथे दिली.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विद्यापीठ परिसरातील पुरातत्व विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर या होत्या. यावेळी पुरात्त्व विभागाचे प्रशासनिक अधिकारी विलीश रामटेके, सर्व्हेअर अशोक तुरे, ज्येष्ठ पत्रकार विलास इंगळे उपस्थित होते. यावेळी शालिनी बिदरकर व नगर भूमापन विभागातील सर्व्हेअर हेमंत औटी यांचा पुरातत्व विभागाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व ऐतिहासिक अजिंठा लेण्याचे शिल्पचित्र देऊन सत्कार करण्यात आला.
अधीक्षक डॉ. चावले पुढे म्हणाले की, नगर भूमापन विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूचे मालकी हक्क (पीआर कार्ड) पुरातत्व विभागाकडे आले आहे. लवकरच मकबरा परिसरातील जमिनीची मोजणी करून तो भाग विकसीत करण्यात येणार आहे, या कामी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाने तातडीन योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहनही डॉ. चावले यांनी यावेळी केले.
नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर यावेळी म्हणाल्या की, बिबी का मकबरा या वास्तूचे पीआर कार्ड आपल्या हातून झाले, हे मी माझे भाग्य समजते. खरे तर याचे श्रेय आम्हाला देण्याचे काही कारण नाही. हा आमच्या कामाचा भाग आहे. भविष्यातही पुरातत्व विभागाची आमच्या खात्याशी संबंधित कामे तातडीने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासनही शालिनी बिदरकर यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलीश रामटेके यांनी केले. कार्यक्रमास पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.