मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे

मुंबई: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये राज्यात पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 30 हजार कि.मी. च्या रस्त्यांची कामे सुरु असून दुसऱ्या टप्प्यात 10 हजार कि.मी. रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामांना येत्या दोन महिन्यात प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंजूरी देणार असून त्यानंतर दिवाळीपासून कामे सुरु करण्यात येतील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी  विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य चंद्रकांत नवघरे यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ग्रामविकासमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील रुखी (ता. वसमत) येथील नॅशनल रोड ते रुखी हा रस्ता वाहतुकीमुळे खराब झाला आहे, या रस्त्याची समितीने तपासणी केली असून 15 दिवसांच्या आत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंत्राटदाराने स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यापूर्वी जे अधिकारी या रस्त्याच्या तपासणीसाठी गेले होते त्यांना त्रुटी आढळल्या नाहीत मात्र समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या रस्त्याच्या कामात त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्यास संबंधितांना निलंबित करण्यात येणार असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यामधील रस्त्यांची कामे सुरु करण्यापूर्वी दर्जेदार कामांसाठी सदस्यांच्या सूचनांचा विचार करु असेही ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितले.

या चर्चेत विधानसभा सदस्य हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, किशोर पाटील, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, सागर मेघे, श्रीमती सरोज अहिरे, नारायण कुचे आदी सदस्यांनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *