हिंगोली: करोनाच्या जागतिक महामारीच्या संकटात २४ मार्च २०२० रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गरजू वकिलांच्या अडचणी व मागणी लक्षात घेऊन सोसायटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कामकाज बंद असल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या एकूण १४०० गरजू ज्युनिअर तथा सिनीयर वकील सदस्यांना अन्नधान्याचे कीट व खर्चासाठी रक्कम देण्यात आली. या अन्नधान्याचे कीटमध्ये गव्हाचे पीठ, तांदंळ, तूरडाळ, साखर, तेल, चहापत्ती तसेच मागणी नुसार ५०० रुपये. रोख भाजीपाल्यासाठी मदत म्हणून देण्यात आले.
अशा प्रकारे सोसायटीच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, पनवेल, धुळे, बुलढाणा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यातील गरजू वकिलांना पहिल्या लॉकडाऊन नंतर तत्काळ २८ मार्चपासून १२ एप्रिलपर्यंत मदत दिलेल्या वकील सदस्यांची नावे जाहीर न करता किंवा वाटपाचे कोणतेही फोटोशेशन न करता, मदतीचे वाटप केले आहे. सरकार व न्यायालयाचे सर्व आदेश व सूचनांचे पालन करून, न्यायालय, प्रशासन व पोलिस यंत्रणेची आवश्यक ती परवानगी काढून, वरील ठिकाणी तात्काळ यंत्रणा उभी करून वकील वर्गाला योग्य वेळी मदत झाल्याने वकिलांचा त्रास कमी झाला. अशा जागतिक महामारीच्या संकटसमयी सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सतीश देशमुख यांनी सोसायटीच्या माध्यमातून गरजू वकील सदस्यांना कर्ज रू. २५००० तत्काळ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही कळविले आहे. या सोसायटीच्या स्थापनेनंतर सोसायटीच्या योग्य व कार्यक्षम वाटचालीने संस्थेच्या शाखा मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, परभणी, नांदेड व हिंगोली येथे कार्यरत आहेत. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात सोसायटीला मुद्रांक विक्रीचा परवाना मिळाला. तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी सोसायटीलासुद्धा मुद्रांक विक्रीचा परवाना मिळण्यासंबधीची याचिका मा. उच्च न्यायालयाने नुकतीच मंजूर करून महाराष्ट्र सरकारला मुद्रांक विक्रीचा परवाना देण्यासाठी सूचना केली आहे. वाटप केलेल्या कर्जावरील व्याज व मुद्रांक विक्रीतून मिळालेले उत्पन्न यातून सोसायटीने अंदाजे २० ते २१ लाख रूपये खर्चून महाराष्ट्रातील वकील सदस्यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटात योग्य वेळी मदतीचा हात पुढे केला आहे.
ॲड. सतीश देशमुख यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिलला स्वतःच्या जनरल फंडातून रू. १ कोटी खर्च व रुल ४० मधून रू. ३३ लाख असे मिळून एकूण १ कोटी ३३ लाख रू. महाराष्ट्र व गोवा राज्यातील गरजू वकील व या २ वर्षात जे वकील दुर्दैवाने वारले त्यांच्या परीवाराला अन्नधान्य कीट व तत्काळ हातखर्चासाठी मदत करण्यास मान्यता मिळाली.
लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व गरजू वकिलांना धैर्य देऊन या अडचणीच्या प्रसंगी त्यांच्या सोबत राहण्यासाठी या सोसायटीने स्वतः कडील १ कोटी ३३ लाख रूपये महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जे संबंधित जिल्ह्याचे पालक सदस्य आहेत, त्यांच्यामार्फत याकामी अगोदर खर्च करण्याचे ठरले आहे व त्याप्रमाणे या सोसायटीने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध ठोक विक्रेत्यांना अन्नधान्य कीटसाठी लागणारी रक्कम तत्काळ देण्याची व्यवस्था उभी केली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल या सोसायटीमार्फत खर्च झालेली रक्कम सोसायटीला परत करणार आहे. ही मदत सेवानिवृत्त होऊन नंतर वकिली करणाऱ्या वकील सदस्यांना मिळणार नसून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा व बार कौन्सिल ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या पात्र व गरजू वकील सदस्यांनाच देण्यात येणार आहे. वरील अन्नधान्य कीट व तत्काळ हातखर्चासाठीची मदत व तत्काळ कर्ज योजना मदत महाराष्ट्रा व गोवा राज्यातील सर्व गरजू सदस्य वकिलांनी घेऊन सर्व वकिलांनी सरकारने वेळोवेळी दिलेले आदेश पाळून घरीच रहावे, असे अवाहन ॲड. सतीश देशमुख यांनी केले आहे. हिंगोली वकिल संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. एच. शिंदे यांच्यासह सर्व वकिलांनी ॲड. सतीश देशमुख यांच्या कार्याचे आणि बार कौन्सिलच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.