अंबाजोगाई: बौध्द साहित्य परिषद अंबाजोगाई व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग (ता.तुळजापूर) यांच्या वतीने आयोजित सातवे बौध्द साहित्य संमेलन रविवार, 20 मार्च रोजी नळदुर्ग येथील बी. के. फंक्शन हॉल, अक्कलकोट रोड येथे चार सत्रात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी आमदार उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने हे आहेत. ज्येष्ठ साहित्यिक तथा आमदार लहू कानडे हे उद्घघाटक असून, स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे हे असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व बौध्द साहित्याचे अभ्यासक यशपाल सरवदे हे उपस्थित राहणार आहेत. ही माहिती बौध्द साहित्य परिषद अंबाजोगाईचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे व नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी दिली.
दिवसभर चार सत्रात चालणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी 12 ते दीड या वेळेत ‘आम्ही केवळ भारतीय आहोत’, या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे राहणार असून मराठा सेवा संघ, लातूर येथील प्रा. डॉ. उमाकांत जाधव, प्रा. डॉ. युवराज धसवाडीकर, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) हे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी अडीच ते साडेतीन या वेळेत दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रीत मान्यवर कविंच्या उपस्थितीत कवी संमेलन होणार आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दुष्यंत कटारे व आभार प्रदर्शन बाळासाहेब बागडे हे करतील. चौथ्या सत्रात दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत पुरस्कार वितरण व संमेलनाचा समारोप उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.