अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चौफेर टोलेबाजी
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत चौफेर टोलेबाजी करत विरोधकांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये राज्यपालांचे अर्धवट अभिभाषण, फडणवीसांचा पेन ड्राईव्ह, नवाब मलिक प्रकरण, राज्यातील ईडी च्या कारवाया, पहाटेचा शपथविधी, पिंपरी-चिंचवड मनपातील भ्रष्टाचार आदी मुद्दय़ावरून विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले.
अंतिम आठवडा चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांनी जे मुद्दे मांडले त्याची नोंद आता बोलतांना घेणार, काहींची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करणार. मी तळमळीने बोलणारा, मला खोटं बोलता येत नाही. राज्यपाल हे एक संविधानिक पद, त्याचे महत्व विरोधकांना माहित. वेळोवेळी तक्रार करण्यासाठी राज्यातील कोणताही नागरिक जाऊ शकतो पण दुर्देवाने जशा या गोष्टी काहीजण पाळतात, अधिकार मानतात तशा काही प्रथा परंपरा मानल्या पाहिजेत.
एखाद्या गोष्टीबद्दल विरोध दर्शवू शकता पण राज्याची एक परंपरा आहे. तीही जपायला हवी. पण तसं झालं नाही, राज्यपालांनी भाषण सुरु केल्यानंतर जो गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला धरून नव्हता. आपण दाऊदचा उल्लेख केलात, तो तेवढ्यापुरताच होता का तर तो तेवढ्यापुरता नव्हता, त्याचा उल्लेख आपण महिनाभर केलात. ज्यावेळी हक्काने शासनाच्या तक्रारी राज्यपालांकडे नोंदवता तेंव्हा राज्य सरकार काय काम करते हे आणि राज्याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल मांडणार होते ते का नाही मांडू दिलंत राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबले नाही, त्यांना थांबू दिले गेले नाही. संसदीय लोकशाहीत एवढा घोर अपमान देशात पहिल्यांदा झाला असेल.
राज्यपालांनी आपल्या भाषणात माझे शासन समाजसुधारकांच्या आदर्शाचे अनुकरण करते असं म्हटलं पण ते तुम्ही अंमलात आणता का हा एक प्रश्न येतोच. राज्यपालांनी आपल्या भाषणात सीमा भागातील जनतेच्या हक्कासाठी उभे राहण्याचा केलेला निर्धार तरी ऐकायला हवा होता. आमच्या छत्रपतींचा अपमान कुणी करील तर त्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज. राज्यपालांनी कोविडमध्ये काय केले, वैद्यकीय संसाधने, ऑक्सीजनची कमी असतांना आपण काय काय केले, हजारो कि.मी वरून ऑक्सीजन आणला हे सांगत होते. ऐकून तरी घ्यायचं होतं की राज्यपाल काय सांगणार होते?
मी हे आधीही सांगितले की हजारो कि.मी वरून आपण ऑक्सीजन आणला. रिकामे टँकर पाठवून, एअर लिफ्ट करून आपण ऑक्सीजन आणला. रात्रंदिवस आपली यंत्रणा कार्यरत होती, मुख्यमंत्री म्हणून मला माझ्या यंत्रणेचा अभिमान आहे. यंत्रणेला आपण कसं वागवतो त्याप्रमाणे ती काम करत असते. अनेक योजना राज्यपाल आपल्या भाषणात सांगणार होते पण त्यांना बोलू दिले नाही
पर्यावरणाबद्दल आपण काय सांगावं, स्कॉटलँण्ड येथील वातावरणीय बदल परिषदेत आपलया महाराष्ट्राने प्रादेशिक पुरस्कार जिंकला त्याचा अभिमान वाटतो असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांना याचा अभिमान वाटतो यातच सगळं आलं. कोविड काळात ५ रुपयात आणि नंतर मोफत जेवण दिले. गोरगरीबांचे पोट यातून भरले आजपर्यंत ८ कोटी थाळ्यांचे वितरण आपण शिवभोजन योजनेत केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आपण ५०० कोटी रुपये दिले आहेत. काळजीपूर्वक याकडेही पहा, यातही तुम्हाला भ्रष्टाचार झालेला दिसेल. आरशाच्या मॅन्युफॅक्चरींगमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो पण त्यात चेहरा पाहणाऱ्याचे काय.
हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ७० टक्के काम झाले आहे. सागरी किनारी मार्गाचे ५० टक्के काम झाले आहे. अनेक पायाभूत सुविधांची कामे आपण करत आहोत पण हे ऐकायची तयारीच नाही. पण ज्यांच्यासाठी हे काम आहे त्या जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. माझ्या ऑपरेशनच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी उत्तम काम केले त्याचा मला अभिमान आहे. झालेल्या कामाना नाकारण्याचा नाकर्तेपणा कधीही कुणी करू नये. महाराष्ट्राला बेवड्याचे राज्य, छत्रपतींच्या राज्याला मद्य राष्ट्र म्हणालात पण वाईन ही कुलूप बंद दुकानात मिळणार आहे. महाराष्ट्राची बदनामी करता मग इतर राज्याचं काय, मध्यप्रदेशातील आकडेवारी पाहिली तर त्याला मध्यप्रदेश म्हणायचे की मद्य प्रदेश हे ठरवा. देशात एक लाख लोकसंख्येमागे मद्य विक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. कर्नाटकात ७.१० मध्यप्रदेश ५.०७ उत्तर प्रदेश २.६० तेलंगणा ६.३०, तामिळनाडू ९.४३ अशी दुकानांची संख्या आहे.
आमच्यावर टीका करा, पण राज्यपाल राज्याचा विकास सांगत होते त्यांना न बोलू देता महाराष्ट्राची बदनामी करत आहात त्याचाही विचार करा. रावणाचा जीव बेंबीत होता तसं काही जणांना सगळं काही मिळालं तरी त्यांचा जीव बेंबीत नाही तर मुंबईत आहे. मुंबईसारखं शहर नाही. मला माझ्या राज्याचा आणि देशाचा जसा अभिमान आहे तसाच तो मुंबईचा, मी या शहरात जन्मलो त्यामुळे या शहरात जे जे हवं ते ते सर्वोत्तम हवं यासाठी मी आग्रही आहे. पब्लिक स्कुलमध्ये काय शिक्षण मिळणार असं म्हटलं जातं. पण आज मुंबई महापालिकेच्या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. आठ भाषेतून शिक्षण देणारी मुंबई ही एकमेव पालिका आहे. विद्यार्थ्यांना टॅबही टेंडर काढून वाटत आहोत. घनकचरा व्यवस्थापन करत आहोत. ८ हजार शौच कुपे आणि १५ हजार शौचालयांचे काम केले आहे. ५०० चौ.फुटाच्या घराला मालमत्ता करातून पूर्ण सुट दिली आहे. निवडक दवाखान्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना सुरु केली. काही चाचण्या मोफत तर काही माफत दरात करत आहोत. मुंबईने कोविड काळात जे काम केले ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झालं. कोविडमधून लोक बरे होतात पण द्वेषाची काविळ कशी दूर करणार. कोविडने पहिले पाऊल राज्यात टाकलं तेंव्हाही राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. त्यावेळी आपण फिल्ड हॉस्पिटल, जम्बो हॉस्पिटल उभारले, मी तर गरज पडली तर लष्कराची मदत घ्यायलाही सांगितली. मला वाटत नाही अशी व्यवस्था इतरत्र कुठे उभे राहिली असेल. काही ठिकाणी नदीत मृतदेह टाकले गेले पण आपण तसे होऊ दिले नाही. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आणि करत राहू. पत्राचाळ असेल, सफाई कामगाराच्या घराचा विषय असेल तो शासनाने मार्गी लावला आहे. २ तारखेला मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन अतिशय दिमाखाने करत आहोत. बीडीडी चाळीचा प्रश्न मार्गी लावला आहे. डबेवाला भवनाला जागा दिली आहे. वरळीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करत आहोत. मेट्रोची कामे सुरु आहेत. मेट्रो कामात १० हजार कोटीच्या वाढीचा प्रस्तावावर विरोधक बोलतात, पण हा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याच काळातील, त्याची चौकशी लावा.
सौर उर्जा प्रकल्प उभे करत आहोत. पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस आणतो आहोत. पर्यावरणाची हानी होऊ न देता शाश्वत विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. तरीही काही गोष्टी अडल्या आहेत. जसे की धारावीचा पुनर्विकास. त्यासाठी रेल्वेची ४० एकर जागा केंद्र शासनाकडून हस्तांतरीत होण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे बाकी आहे. मुंबई हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण असेल तोही केंद्राकडे प्रलंबित आहे. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा प्रश्न कोर्टात असला तरी यात केंद्र सरकार पालक म्हणून निष्पक्ष भूमिका घेत नाही, त्यांची कोर्टातील बाजू पाहिली तर ते कोणती भूमिका घेतात हे लक्षात येते. दहिसर भुखंडाबाबत कोणी कसा पाठपुरावा केला, ज्यांनी जमिनीची किंमत ठरवली ते महसूल खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं त्याचा पाठपुरावा मागच्याच सरकारच्या काळात झाला. तो कुणी केला हे ही सगळ्यांना माहित आहे (आमदार मनिषा चौधरी यांचे नाव) घेऊन ताई तुम्हाला तिथे हॉस्पीटल हवं होतं की नाही, ती जशी तुमची मागणी, तशीच आमचीही आहे. म्हणून आम्ही पाठपुरावा केला. यात मग भ्रष्टाचार कसा झाला. कोर्टाने यात आक्षेप घेतला की याला वाजवीपेक्षा जास्त दर दिला. पण हा दर महसूल विभागाने त्यावेळी निश्चित केलेला.
कोविड काळात महापालिकेने अप्रतिम काम केले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यात तातडीने करावयाच्या कामाचा उल्लेख आहे. यात स्पष्ट नमूद आहे की केलेल्या कामावर आक्षेप घेता येत नाही. कोविडशी लढतांना पंतप्रधानांनी ही सर्व राज्यांना सारखी मदत केली हे ही मी प्रामाणिकपणे मान्य करतो. कोविडच्या सुरुवातीला जनरल फायनांशियल ग्रुप ने एन ९५, पीपीई कीट सारख्या साहित्याची वाटाघाटी करून किंमती ठरवल्या आणि वस्तू खरेदी केल्या. जीव वाचवण्याला प्राथमिकता होती, तेच काम महापालिकेने केले. महापालिकेने एक ही काम विना निविदा केले नाही, त्यातही जे दर सर्वात कमी आले त्याला काम दिले. तरी भ्रष्टाचाराचा आरोप करून महापालिकेच्या कामावर पाणी पाडण्याचे काम सुरु आहे. धारावी वाचवण्याचे काम आपण करून दाखवलं, केंद्रीय पथक त्यावेळी धारावी वाचवण्याचा आग्रह धरत होते. अभिमानाने सांगतो की महापालिकेची यंत्रणा धारावीत उतरून त्यांनी धारावी वाचवली पण त्याचे कुणालाच कौतूक नाही. यात कुठे भ्रष्टाचार आहे?
आमचं सरकार येण्याआधी आठ ते ९ वेळा सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे टेंडर काढले, या सरकारने बदललेल्या नियमानुसार, बदललेल्या तंत्रज्ञानानुसार नवीन टेंडर काढले, पण किंमतीच्या ६० ते ७५ टक्के दर अधिक आल्याने ते रदद्द करून पुन्हा टेंडर काढली. काही स्वयंसेवी संस्था कोर्टात गेलया. सुप्रिम कोर्टाने ही सर्व प्रक्रिया त्यांच्यासमोर सुरु केली. तांत्रिक कामाचे पाकिट उघडले गेले पण दरपत्रकाचे पाकिट अजून उघडलही नाही तर त्यात भ्रष्टाचार कसा झाला, हा पेन ड्राईव्ह तुमच्याकडे कुठून आला. हा अन्याय आहे. अर्थमंत्र्यांनी पंचसुत्रीच्या आधारे जीवनावश्यक गोष्टीला केंद्रीभूत ठेऊन अर्थसंकल्प मांडला. कठीण काळात जे करता येणार आहे त्यावर अप्रतिम अर्थसंकल्प त्यांनी तयार केला आणि मांडला. प्रतिमा आणि बदनामी यावर काम सुरु आहे. मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मी कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे
नवाब मलिकांवर तथ्यहीन आरोप. केंद्रीय संस्था एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हे दाऊद हस्तक असतांना सगळीकडे वावरत असतांना सातत्याने निवडून येत असतांना तोपर्यंत या यंत्रणांना काहीच कळलं नाही? केंद्रीय यंत्रणा मग त्या काळात काय करत होती, दिवे लावत होती का, की थाळ्या वाजवत होती. बाण लक्ष्यवेध करणारे हवेत, पण आता हे बाण हातात धरून खुपसले जात आहेत. ईडीएवढी बेकार का, की ते तुम्ही दिलेल्या माहितीवर चौकशी करत आहे. ती ईडी की घरगडी हे काहीच कळत नाहीय. दाऊद आहे कुठे हो, माहितीय कुणाला, निवडणूकीसाठी हा विषय किती काळ घेणार. आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार का? दाऊदच्या मागे आपण आता फरफटत चाललो आहोत. ओबामाने ओसामाच्या नावाने मत मागितले का हो, त्यांनी घरात घुसून तालिबान्यांना मारलं, ओसामा बीनन लादेनला मारलं, याला म्हणतात मर्दपणा. आम्ही देशद्रोह्यांविरोधातच. त्याबाबत कुठेही दुमत नाही. पण त्याआधी तुम्ही सांगा महेबूबा मुफ्तीबरोबर तुम्ही बसलात, त्याचे काय? ज्याने लोकशाहीच्या मंदिरावर, संसदेवर हल्ला केला, त्यावेळी मुफ्ती काय म्हणाल्या अफलज गुरुला फाशी देऊ नका. बुरहान वाणीला मारल्यानंतरही त्या बोलल्या त्यावेळी तुम्ही त्यांच्याबरोबर होता.
मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच, माझे विचार कधीही बदलले नाहीत. मुद्दसर लांबेचा मुद्दा ही आहेच. माहिम दर्ग्यात आपल्याला हार घालतांनाचे (देवेंद्र फडणवीस) क्रांतीकारी फोटो सर्वत्र आहेतच. लांबे यांच्या नियुक्तीच्या पत्रावर तत्कालीन मंत्र्यांनी हिरव्या शाईने सही केली. ती सही विनोद तावडेंची आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. केवळ आरोप करून चालत नाही, आरोप करतांना तु किती चांगला आहे हे ही सांगावं लागतं, चांगलं काम ही सांगावं लागतं, ते तरी सांगा. हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती म्हणून झोपेचे औषध घ्यावं लागलं हे त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आता ते तुमच्याकडे आल्यानंतर शांत झोपताहेत, तुमच्याकडे आल्यानंतर शांत झोप कशी लागते हे त्यांना एकदा विचारावं लागेल.
·
सकाळच्या शपथीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असतेच ना. संस्थांचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याचं काम सुरु आहे. लढण्याची ताकत नाही म्हणून शिखंडीला पुढं आणून जसं महाभारतात युद्ध लढलं गेलं तसं युद्ध आता सुरु आहे. घराघरातलया कुटुंबियांना बदनाम करायचे, धाडी टाकायचं काम सुरु आहे. नितीन गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो, मग सांगा, तुम्ही ह्युमन लाँड्रींग सुरु केले आहे का, तुमच्याकडे आल्यावर सगळे शुद्ध कसे होतात? हे राज्य ध्रृतराष्ट्र नाही, हा छत्रपतींचा लढवय्या महाराष्ट्र आहे. पण खरचं अशा आरोप प्रत्यारोपातून काही मिळणार आहे का. यातून काहीच होणार नाही. विधानभवनात येण्याची अनेकांची इच्छा असते, ही लोकसेवेची संधी आहे, त्याची माती करू नका, नवी कल्पना सांगा, आमच्यात गुन्हेगार असतील तर सांगा, आम्ही चुकत असू तर ते सांगा पण राज्य हिताच्या कामात अडथळा आणू नका. सत्ता पाहिजे आहे ना, पेन ड्राईव्ह गोळा करू नका, मी तुमच्यासोबत येतो, सत्तेसाठी नाही, तुम्ही जे चाळे केले, माझ्या कुटुंबियांना बदनाम करत आहात, मालमततेवर टाच. मी टाचेला घाबरत नाही. या मला तुरुंगात टाका. मी कधीही तुमच्या कुटुंबियाना त्रास दिला नाही. एवढाच जीव जळत असेल तर मला तुरुंगात टाका, मी भावनिक बोलतो, हो बोलतो. बाबरीच्याखाली राममंदीर होते, तसे कृष्णजन्मस्थळाच्या खालच्या तुरुंगात मला टाका. मी जसा कृष्ण नाही तसे तुम्ही कंस नाहीत एवढं लक्षात ठेवा, बाळासाहेबांना काय तोंड दाखवणार असा आरोप करता पण बाळासाहेबांनी तुमच्या ज्या नेत्यांना वाचवलं ते तरी बाळासाहेबांकडे गेल्यावर काय सांगणार, काय उत्तर देणार ते ही सांगा. मी हिंदुत्वापासून फारकत घेतली नाही, मी हिंदू आहे सर्व सहकाऱ्यांना माहिती आहे. तुरुंगात टाकलं तरी मी सगळ्यांच्यावतीने ती जबाबदारी घेतो. ज्यांनी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांना छळू नका. हा तुरुंगात जाणार, तो तुरुंगात जाणार असं जे म्हणतात ते केंद्रीय संस्थांचे दलाल आहेत का? इंदिरा गांधींनी जाहीरपणे आणीबाणी घोषित केली, ही अघोषित आणीबाणी आहे. जाहीर आणीबाणी लावायला धारिष्ट लागते.
अनाधिकृत बांधकामे सगळ्यांची पाडा, असे कुणाला पदराआड लपवू नका. मुंबई महानगरपालिकेत घोटाळा तसे पिंपरी चिंचवड पालिकेतला घोटाळाही पकडलाच ना. मी बहिणाबाई चौधरींची कविता वाचतो, त्यांनी वर्मी लागेल असे कवितेत म्हटलं आहे. कवितेत त्यांनी “माणसा माणसा कधी होशील माणुस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस” असं म्हटलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावेळी जे झालं, आता ही जी चिखलफेक होत आहे ती थांबायला हवी. मला या निमित्ताने प्रसार माध्यमांनाही विनंती करायची आहे की, कुणाचे तरी आयुष्य उद्ध्वस्त होणाऱ्या बातम्या दाखवू नका, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.