वीर शैव कक्कया कल्याण मंडळाचा प्रस्ताव शासनास सादर

योग्य ती कार्यवाही करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन

मुंबई: मागील दोन वर्षांपासून स्वतंत्र कक्कया शासकीय महामंडळ निर्मितीसाठी २९८ तालुक्यांना भेटी देवून अंदाजे पंधरा हजार किलोमीटर अंतराचा प्रवास केला आहे. आणि विखुरलेल्या समाजाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन महामंडळ निर्मितीचा प्रस्ताव २५ मार्च २०२२ रोजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात आला. यावेळी उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, वीर शैव कक्कया कल्याण मंडळांचे अध्यक्ष महादेव कृष्णा शिंदे, मुख्य प्रवक्ते रवींद्र रूपचंद शिंदे, सचिव यशवंत ब. नारायणकर, सदस्य सूर्यकांत इंगळे आदींची उपस्थिती होती.

शासनाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सरकारी कागदपत्रे, तालुका, गावातील आयोजित सभा, जनसंख्या, पारंपरिक व्यवसाय सध्याची परिस्थिती याबाबत पुरावे व समाज बांधवांची स्वतंत्र माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून शासकीय दरबारी एकूण ९७ पानांचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला आहे. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून प्रस्तावाची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिली. मुंडे यांनी येत्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना बैठक घेण्याचे निर्देश देण्यात येतील आणि योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आमदार दिलीप मामा लांडे यांची ‘ती’ क्लिप व्हायरल:
मुंबईत कक्कया समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळे संत कक्कया महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी चांदिवली मुंबई चे आमदार दिलीप मामा लांडे यांनी विधानसभेत मागणी केली. त्यांच्या या विधीमंडळातील भाषणाची क्लिप समाज माध्यमात व विशेषत: समाजाच्या वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. तसेच आमदार दिलीप मामा लांडे यांनी केलेल्या मागणीबद्दल त्यांना विर शैव कक्कया समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन ऋण व्यक्त केले आहे.

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *