सर्वधर्मीय समाज बांधवांसाठी मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी

सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी अंबाजोगाईत मुस्लिम तरुणांचा पुढाकार

अंबाजोगाई: राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंगे व हनुमान चालीसावरून राजकीय वातावरण तापलेले असताना अंबाजोगाईतील मुस्लिम तरुणांनी सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या तरुणांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि.२१) सायंकाळी अंबाजोगाईतील मरकस मस्जिदमध्ये मुस्लिमेतर समाज बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात मशिदींवरील भोंगे व हनुमान चालीसावरून वातावरण चांगलेच तापले आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागांतूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय मंडळीदेखील यावर आरोप-प्रत्यारोप करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. मात्र, आजवर एकही धार्मिक दंगल न होऊ देता आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या अंबाजोगाईकरांनी याही वेळेस सामाजिक एकोपा जपला आहे. शहरातील मुस्लिम तरुणांनी सामाजिक सलोखा जपण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मरकस मस्जिद येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता मुस्लिमेतर बांधवांसाठी विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.

भारतातील सर्व समाजातील बंधुभाव कायम राहावा, यासाठी आपल्या शहरापासून सुरुवात करावी असा या मागचा उद्देश असल्याचे या तरुणांनी सांगितले. या पार्टीसाठी शहरातील सर्व समाजातील नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सामाजिक एकोपा जपण्यासाठी शहराच्या नावलौकिकाला साजेसा कौतुकास्पद उपक्रम आयोजित केल्याबद्दल या तरुणांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *