पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना ७८ कोटी रुपयांचे वितरण

पुणे: पुणे-नाशिक मध्यम द्रुतगती रेल्वेमार्गाच्या कामाकरिता हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द, तुळापूर, भावडी य तीन गावातील जमिनीच्या भूसंपादनाचे खरेदीखत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचा सदुपयोग करावा, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला यावेळी उपजिल्हाधिकारी व भूसंपदान अधिकारी रोहिणी आखाडे, महारेल (जमिन) सहमहाव्यवस्थापक भानुदास गायकवाड, महारेलचे सहमहाव्यवस्थापक सुनील हवालदार उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्दचे ८ गट, तुळापूर २ आणि भावडीतील १ गटाचे खरेदीखत करण्यात आले असून यामध्ये शेतकऱ्यांना ७८ कोटी रुपयांचा भूसंपादन मोबदला वाटप करण्यात येत आहे. हवेली तालुक्यातील पेरणे, भावडी, तुळापूर व मांजरी खुर्द गावातील ७० टक्के खरेदीखताची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत खरेदीखते लवकरच पूर्ण करण्यात येतील. खेड तालुक्यातील बाह्य वळणरस्ता व रेल्वे मोजणीची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून लवकरच त्यांच्याही भूसंपादनाचा मोबदला वाटप करण्यात येईल. भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर तातडीने रेल्वेमार्गाच्या  कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मांजरी खुर्दचे माजी सरपंच किशोर उंद्रे यांनी जमीन खरेदीला चांगला मोबदला दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या हस्ते मांजरी खुर्द, तुळापूर आणि भावडी गावातील जमीन धारक शेतकऱ्यांना स्वाक्षरीसाठी खरेदीखताचे दस्त वाटप करण्यात आले. यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *