अतुल कुलकर्णी होल्डवर तर अक्षय शिंदे यांच्यासाठी फिल्डिंग…
जालना/नारायण माने: राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ तब्बल आठ दिवसाचा कालावधी उलटला तरी देखील जालना येथे नव्याने बदलून येणारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे अद्यापपर्यंत रुजू झालेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उत आला आहे. जालन्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीनेच श्री. कुलकर्णी यांना होल्डवर ठेवून, जालना येथे पूर्वी एसआरपीएफमध्ये समादेशक असलेले आयपीएस अधिकारी अक्षय शिंदे यांना आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएस अक्षय शिंदे यांची उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झालेली असून, तेदेखील तेथे अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्कांच्या बातम्यांना अधिक पुष्टी मिळत आहे.
राज्याच्या गृहविभागाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या 20 एप्रिलला बदल्या केल्या आहेत. या आदेशानंतर बहुतेक अधिकारी बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू झालेले आहेत. मात्र, जालना येथे चंद्रपूर येथून बदलून येणारे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी हे अद्यापही रुजू झालेले नाहीत. सन 2015 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी मीरा भाईंदर, नांदेड, भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष तरुण अधिकारी म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी नसल्यामुळे मागील दोन वर्षात जिल्ह्यात पोलीस दलाची प्रतिमा मलिन होऊन, सर्वत्र अवैध धंदे, खून, दरोडे, चोऱ्या आणि अवैध शस्त्रांचा मोठा वापर वाढला होता. जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या सापळ्यात अडकले होते. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतानाच आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी हे येणार असल्याच्या बातमीने सर्वसामान्य जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, ही दिलासादायक बातमी तर्कवितर्कांना आणि चर्चांना आलेल्या उत्तामुळे मृगजळ ठरतेय की काय? अशी भीती आहे.
जालना येथील एका बड्या लोकप्रतिनिधीने मंत्रालय पातळीवर जोरदार ताकद वापरून, कडक शिस्तीच्या कुलकर्णी यांना जालन्यात येण्यापासून रोखल्याची चर्चा जोर धरत आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी जालना येथे आणण्यासाठी कुलकर्णी यांना चंद्रपूर येथून काही दिवस सोडूच नये, असा हट्ट धरल्याने गृहविभागाने देखील कुलकर्णी यांना काही दिवस चंद्रपुरातच थांबण्याचे आदेश दिल्याचे समजते.
जालन्याच्या या बड्या लोकप्रतिनिधींचा आयपीएस अधिकारी अक्षय अशोक शिंदे यांना आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिंदे यांची नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त पदावरून उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक म्हणून 20 एप्रिलच्याच आदेशानुसार बदली झालेली आहे. मात्र, अद्यापही शिंदे हे उस्मानाबादला रुजू झालेले नाहीत. शिंदे हे नागपूरला बदलून जाण्यापूर्वी दोन वर्षाअगोदर जालना येथे एसआरपीएफमध्ये समादेशक म्हणून कार्यरत होते. या दोन वर्षांच्या काळात शिंदे यांचे येथील लोकप्रतिनिधीसोबत जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले असल्याने, तेदेखील जालन्यात बदलून येण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यातच जिल्ह्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने देखील या बड्या लोकप्रतिनिधीकडे शिंदे यांनाच जालन्यात आणण्यासाठी शिफारस केल्याचे सांगितले जात आहे. पूर्वीचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याप्रमाणेच शिंदे यांचे देखील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसोबत नात्यागोत्याचे संबंध असल्याची चर्चा आहे. कुलकर्णी यांना जालन्यात येण्यापासून रोखण्यात लोकप्रतिनिधी यशस्वी झाले आणि पुन्हा पोलीस दलात नात्यागोत्याचे राजकारण सुरू झाले तर पुन्हा “पहिले पाढे पंचावन्न” म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर येणार आहे.