आ. मुंदडांनी घेतली कंत्राटदाराची हजेरी अन् लवकर काम पूर्ण करण्याची हमी
अंबाजोगाई: केज मतदार संघातून जाणाऱ्या ५४८-ड या महामार्गाचे काम कंत्राटदाराच्या ढिसाळपणामुळे मागील २ वर्षापासून रखडल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही कंत्राटदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आ. नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवार, २ मे सोमवार रोजी बैठक घेतली. बैठकीत कंत्राटदारास कडक शब्दात सूचना देऊन आ. मुंदडा यांनी त्याच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र घेतले. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय हालअपेष्टा सहन करतो ते एकदा तुम्हीही अनुभवा असे म्हणत कंत्राटदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फिरवले.
अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा ८२ किमीचा ५४८-ड महामार्ग जातो. याचे काम कोरोनाच्या काळात रखडले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही कंत्राटदाराच्या ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत कंत्राटदाराने रडत-पडत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, केज मतदार संघातील अंबाजोगाईतील रिंग रोड, येळंबघाट येथील पूल, पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मार्गातील गावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते यांचे काम अर्धवट आहे. यामुळे खड्डे, धूळ याचा नागरिकांना प्रचंड त्रास आहे. अनेक अपघात झाले, जवळपास ३८ लोकांचे बळी गेले तरी कामाने वेग पकडला नाही. आ. मुंदडा यांनी आतापर्यंत चार वेळेस बैठक घेऊनही कंत्राटदाराने काम त्वरित पूर्ण करण्याची केवळ पोकळ हमी दिली, काम केलेच नाही. अखेर, सोमवारी आ. मुंदडा यांनी कंत्राटदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा,सा.बा.वि.चे अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी महार्गाच्या अभियंत्यांनीही विलंबासाठी कंत्राटदारावर ठपका ठेवला. वेळोवेळी कामाचे देयके देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कंत्राटदाराने या कामासाठीचे मनुष्यबळ दुसरीकडे स्थलांतरित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आ. मुंदडा यांनी कंत्राटदाराने खडसावल्यानंतर त्याने अधिक लांबीचे काम, ॲप्रोच रस्तेचे काम ३१ मे पर्यंत, रस्त्याचे राहिलेले छोटे तुकडे ३० जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले.
कंत्राटदाराची दिलगिरी: दरम्यान, माझ्या मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा असे म्हणत आ. मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडले. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याने फेरी मारल्यानंतर गुत्तेदाराने दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली.