नांदेड: लंगर साहिब गुरुद्वारामध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना नेण्यासाठी पंजाब सरकारने सोडलेल्या 80 बस नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत. सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी नांदेड येथे आलेल्या पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली येथील भाविक लॉकडाऊनमुळे येथेच अडकून पडले. मागील दीड महिन्यापासून ते नांदेड येथे मुख्य गुरुद्वारा व लंगर साहिब गुरुद्वाराच्या यात्री निवासमध्ये थांबून आहेत. केंद्र व राज्य सरकारने त्यांना परत जाण्याची परवानगी दिली आहे, त्यानुसार परतीची ही प्रक्रिया केली जात आहे. विशेष म्हणजे अडकलेल्या भाविकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी 20 एप्रिल रोजी maharashtratoday.live ने लॉकडाऊनमुळे नांदेडमध्ये अडकले शीख भाविक, असे वृत्त दिले होते.
लंगरसाहिब गुरुद्वाराच्या वतीने 14 बस व 12 टेम्पो ट्रॅव्हल्स भाड्याने करून यात्रेकरूंना घेऊन रवाना केले आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे मुखी संतबाबा नरेंद्रसिंघजी व संतबाबा बलविंदरसिंघजी, खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सचखंड गुरुद्वाराच्या वतीने तेथे थांबलेल्या 330 यात्रेकरूंना घेऊन 10 बस पंजाबला रवाना झाल्या होत्या. त्या पंजाबला पोहचल्या आहेत, अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष सरदार भूपिंदरसिंघ मनहास यांनी दिली.
आतापर्यंत जवळपास 900 भाविक पंजाबला रवाना झाले असून आणखी सुमारे 3 हजार यात्रेकरू नांदेड येथे आहेत. त्यांना नेण्यासाठी पंजाब सरकारने 80 बस पाठवल्या आहेत. त्या आज सोमवारी सकाळी नांदेड येथे लंगरसाहिब गुरुद्वारामध्ये आल्या असून, आज सांयकाळी भाविकांना घेऊन पंजाब ला रवाना होतील, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी दिली.