पुणे: दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भागापर्यंत दाखल झालेल्या मान्सूनची गती शनिवारी मंदावली आहे. मात्र, पुढील आठवड्यात मान्सून केरळची किनारपट्टी गाठणार आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस उत्तर भारतात गारांसह मुसळधार तर ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यातील पाऊस कमी झाला आहे. असे असले तरी कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व भागापर्यंत मान्सूनने आगेकूच केली होती. मात्र, शनिवारी अनुकूल स्थितीच्या अभावामुळे मान्सूनची आगेकूच मंदावली आहे. उत्तर पूर्व राजस्थानपासून ते पूर्व आसामपर्यंत पश्चिमी चक्रावात सक्रीय झाला आहे. याच्या परिणामामुळे जम्मू काश्मीर, हिमालच प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, उत्तराखंड या भागात 22 ते 24 मार्च दरम्यान गारांसह मुसळधार पाऊस पडेल. त्याचबरोबर या भागात जोरदार वारे आणि मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्व राजस्थान भागात मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट तयार होणार आहेत. रॉयलसीमा ते कर्नाटकपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे केरळ, कर्नाटक या राज्यासह ईशान्य भारतामधील अरूणाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोरम, त्रिपुरा, सब हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.