मान्सूनने पुणे, मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे: अनुकूल स्थितीच्या फायद्यामुळे मान्सूनने जोरदार मुसंडी मारली आहे. शनिवारी मान्सूनने पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसात मराठवाडा, कोकणचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा उर्वरित भाग तसेच विदर्भापर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या किनारपट्टीवर अनुकूल स्थितीअभावी रेंगाळलेल्या मान्सूनला गुरूवारपासून अनुकूल स्थिती मिळाल्यामुळे जोरदार मुसंडी मारीत गोवा, कोकणपर्यंत म्हणजेच महाराष्ट्राच्या सीमेपर्यत मुसंडी मारली आहे. त्यातच शनिवारी आणखी वाढ होऊन मान्सूनने कोकणच्या काही भागासह मुंबई, पुणे या शहरासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहचला आहे.

सध्या मान्सून पुढे सरकण्यास आणखी स्थिती योग्य मिळत आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसात कोकणचा काही भाग, मराठवाडा तसेच विदर्भापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. याबरोबरच राज्याच्या शेजारी असलेले गुजरात, मध्य प्रदेश (काही भाग), संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, अरबी समुद्राचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील पूर्व पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेकडील प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमालयाचा बहुतांश भाग, सिक्कीम ओडिशा किनारपट्टी, झारखंड आणि बिहारपर्यंत धडक मारणार आहे.

कमी दाबाचा पट्टा मान्सूनला पोषक

मान्सूनच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रच्या किनारपट्टीपासून ते दक्षिण कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. या पट्ट्याबरोबरच दक्षिण गुजरातपासून ते मध्य अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही स्थितीच्या परिणामामुळे मान्सूनला आगेकूच करण्यास अत्यंत पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून उत्तर भारताकडे देखील जोरदार सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

राज्यात पुढील तीन ते चार दिवस ताशी 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहे. त्यातच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटामुळे राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, राजस्थान, चंदीगड, गोवा, दक्षिण गुजरातची किनारपट्टी, दक्षिण ओडिशा, आंध्रप्रदेश, बंगालचा उपसागरातील काही भाग, अरबी समुद्राच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात पावसाचा यलो अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, उसमानाबाद, औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *