अनिवासी अंबाजोगाईकर यांचा विशेष सहभाग, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य, डॉ. दिलीप घारे उदघाटक; समारोप डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या उपस्थितीत
अंबाजोगाई: मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईचे दर दोन वर्षांनी होणारे अंबाजोगाई साहित्य संमेलन या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या १९,२० व २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या संमेलनात अनिवासी अंबाजोगाईकर यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. आय. खडकभावी व मसापचे सचिव गोरख शेंद्रे यांनी दिली.
अंबाजोगाई साहित्य संमेलन हे दर दोन वर्षांनी घेतले जाते. १९९६ मध्ये पाहिले संमेलन घेतले गेले. त्यानंतर नऊ संमेलने आज पर्यंत घेतली गेले आहेत. हे १० वे संमेलन आहे. अंबाजोगाईचे नागरीक अनेक क्षेत्रात महाराष्ट्रात, देशात व परदेशात व्यवसाय, नौकरी, पत्रकारिता, न्याय, नाट्य, ललित कला, संगीत, अभिनय, शिक्षण, विज्ञान, इतिहास, सामाजिक प्रशासन आदी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून आपली प्रगती करत आहेत. अशा सर्वांचा या संमेलनात सहभाग असणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांची यापूर्वीच निवड करण्यात आली असून, त्यासाठी स्वागत समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्नाटकातून इथे स्थायिक होऊन त्यांनी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित पोलिटेक्निकल व इंजिनियरिंग क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करून महाराष्ट्रात अंबाजोगाईचा नावलौकिक त्यांनी मिळविला आहे.
व्हाटस् अप ग्रुपच्या माध्यमातून अनिवासी अंबाजोगाई करांना आवाहन: दर दोन वर्षांनी होणारे हे संमेलन भव्य दिव्य व आगळे वेगळे ठरावे व या संमेलनात जास्तीत जास्त अनिवासी अंबाजोगाईकरांना सहभागी होता यावे यासाठी संमेलनाचे आयोजक व मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेने एक व्हाटस् अप ग्रुप केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून नोकरी, व्यवसायासाठी राज्य, देश व विदेशात स्थायीक झालेल्या अंबाजोगाई करांना साद
घालण्यात आली आहे. मसाप अंबाजोगाई शाखेच्या या आवाहनाला अनिवासी अंबाजोगाई करांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून, हे साहित्य संमेलन नक्कीच आगळे वेगळे व भव्य दिव्य असे होणार असल्याचे संमेलनाचे आयोजक व मसाप अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी सांगितले.
संमेलनाध्यक्ष दासू वैद्य: १० व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अंबाजोगाईचे सुपूत्र सुप्रसिद्ध कवी, नाटककार, गीतकार तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य यांची यापूर्वीच निवड करण्यात आली असून, साहित्य क्षेत्रात वेगळा दबदबा त्यांनी अल्पवधीत निर्माण केला आहे. अनेक चित्रपटांचे व मराठी मालिकांचे शीर्षक गीते त्यांनी लिहिली. अनेक ख्यातनाम गायकांनी ती गायली आहेत व ती गीते मराठी रसिकांच्या ओठांवर सतत असतात. नाटक, ललित, व पद्य लेखना बरोबर गद्य लेखनही त्यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे ते प्रमुख असून विद्यापीठ स्थापित आद्यकवी मुकुंदराज अध्यासनाचे ते पहिले संचालक म्हणूनही कार्य करीत आहेत. अ. भा. मराठीत साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, साहित्य अकादमीचे बहुभाषिक कविसंमेलन, इतर प्रादेशिक व साहित्य संस्था आयोजित कवी संमेलन व विविध परिसंवाद यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला आहे. नाट्यशास्त्रात त्यांनी पदवी मिळवून नाट्य, बालनाट्य लेखन केले आहे. मराठवाड्याचे महत्वाचे लेखक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे यांच्या साहित्यावर संशोधनात्मक प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली असून त्यांना मानाचे प्रतिष्ठीत पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रा. दिलीप घारे उदघाटक तर डॉ. वृषाली किन्हाळकर समारोपाच्या मुख्य अतिथी: या संमेलनाचे उदघाटन अंबाजोगाईचे भूमिपुत्र ज्येष्ठ नाट्य व सिने कलावंत प्रा. दिलीप घारे यांच्या हस्ते होणार असून घारे यांना अभिनयाचे बाळकडू अंबाजोगाईतच मिळाळे. काळा हनुमान सांस्कृतिक मंडळाच्या मेळ्यातून व अंबाजोगाईतील नाटकातून त्यांनी अभिनयाचे काम केले व अभिनयात प्राविण्य मिळविले. पुढे औरंगाबाद येथे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत नाट्य विभाग प्रमुख म्हणून त्यांनी सेवा केली. अनेक चित्रपट, नाटक व नाराठी मालिकेतून त्यांनी कला सादर केली आहे. प्रा. यशवंत देशमुख व प्रा. दिलीप घारे यांचे ‘गाजराची पुंगी’ हे दोनपात्री नाटक महाराष्ट्रभर गाजले आहे. अशा गुणी कलावंताच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होणार आहे.
संमेलनाचा समारोप ख्यातनाम कवियत्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. डॉ. किन्हाळकर ह्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाईच्या माजी विद्यार्थिनी असून त्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, कवियत्री, व्याख्यात्या व लेखिका आहेत. स्रियांच्या दुःख, वेदना व व्यथा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या आहेत. उस्मानाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. अनेक पुरस्कार- मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
या संमेलनात कवी संमेलन, पत्रकारिता, महिला, ललित कला आदी विषयांवर परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. त्याच बरोबर कथाकथन, “माझ्या सवे गंध अंबाजोगाईचा” या विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवारांच्या मुलाखती, मनोगते आयोजित केली जाणार आहेत. संमेलनाचे माजी दिवंगत अध्यक्ष प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पूरस्कार, मंदा देशमुख कथा लेखक पुरस्कार व प्राचार्या शैला लोहिया लेखिका पुरस्कार प्रदान केले जातील. त्याचे स्वरूप प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, शाल, स्मृती चिन्ह व शाल पुष्पहार असे आहे. पुस्तक प्रदर्शने, कला प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम याच बरोबर सहभागी रसिकांचा विविध गुण दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
हे संमेलन अनिवासी अंबाजोगाईकर यांच्यासाठी खास असल्याने अंबाजोगाईच्या स्थानिक रसिकांकमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनिवासी अंबाजोगाईकर यांचा या संमेलनात येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र, देश परदेशातून प्रतिसाद मिळत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे, माजी अध्यक्ष व मार्गदर्शक अमर हबीब स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी व मसाप कार्यकारणी सदस्य व स्वागत समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. हे संमेलन रसिकाश्रयी असल्याने केवळ रसिकांकडून १०० रुपये स्वागत मूल्य घेऊन हे संमेलन दर दोन वर्षांनी भरवले जाते. या वर्षी हे दहावे अंबाजोगाई साहित्य संमेलन भटविले जात आहे. आपणही स्वागत मूल्य शंभर भरून स्वागत सदस्य व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. आय. खडकभावी व मसाप सचिव गोरख शेंद्रे यांनी केले आहे.