प्रतिकात्मक छायाचित्र
मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील आणखी एका पोलिसाचा आज सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडलेल्या पोलिसांची संख्या तीन झाली आहे. कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत असलेले ५६ वर्षीय हवालदार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर केईएम रग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी शनिवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल व नवी मुंबईतील कामोठे येथे राहणारे हेड कॉन्स्टेबल अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील ९६ पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात १५ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या संसर्गाने आता आणखी एका पोलिस हवालदार यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलिस दल हादरून गेले आहे. पोलिस हवालदार यांचा मृत्यू झाल्याचे मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरही नमूद केले आहे. विशेष म्हणजे कालच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष व मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव ठेवण्याचे सांगितले होते. तसेच मृत पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रूपये मदत व योग्य ती शासकीय नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत देण्याची घोषणा केली होती.