फुकटचे शहाणपण

शेती- शेतकऱ्यांबद्दल कळत नसेल तर बोलू नका: शेतकरी नेते अमर हबीब यांची केंद्र सरकारवर टीका

अंबाजोगाई: प्रधानमंत्री म्हणतात, ‘सेंद्रिय शेती करा.’ तर केंद्रीय मंत्री म्हणतात, ‘अमेरिकेत सोयाबीनचे एकरी उत्पादन भारतापेक्षा दहा पटी पेक्षा जास्त आहे.’ अशी संभ्रमात टाकणारी विधाने केल्याबद्दल शेतकरी नेते व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

1) प्रधानमंत्र्यांना शेतीतले काही कळत असेल का? त्यांना भारतीय शेतीची स्थितीचे आकलन असेल का?
2) निवडून येण्याची क्षमता असणे एक बाब आहे, निवडून येणाऱ्यास सगळे समजते, असे समजून निवडून आलेल्याने बोलू नये.
3) प्रधानमंत्र्यांना शेतकरी येडे वाटतात का? त्यांना लागले शहाणपण शिकवायला! भारतातले शेतकरी परंपरेने शेती करत आले आहेत. अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्याकडे आहे. कोणाही  उपटसुंभाने येऊन त्यांना अशी शेती करा, असे सांगू नये!
4) सेंद्रिय शेती करायची का रासायनिक करायची, हे शेतकऱ्यांना ठरवू द्या
5) एकेकाळी चंपारणच्या शेतकऱ्यांवर नीलची शेती करण्याची इंग्रजांनी सक्ती केली होती, म. गांधींनी सत्याग्रह करून ती सक्ती हणून पाडली होती, हे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी विसरू नये.

अमेरिकेच्या उत्पादकतेचे कौतुक:
1) अमेरिकेची एकरी उत्पादकता जास्त आहे, हे सर्वश्रुत आहे. आत्ताच उत्पादकता वादळी, असे नाही. उत्पादकतेच्या बाबतीत अमेरिका नेहमीच पुढे राहिला आहे
2) सोयाबीनच्या बाबतीतच नव्हे तर अनेक कृषी उत्पादनात अमेरिका आघाडीवर आहे.
3) केंद्रातले मंत्री हे कोणाला सांगतात? शेतकऱ्यांना! कायद्यांनी करकचून बांधलेले शेतकरी काय करणार? जी गोष्ट मंत्रिमंडळात सांगितली पाहिजे ती तुम्ही आम्हाला का सांगता?
4) उत्पादकता वाढली तर शेतकऱ्यांचे भले होते का? सत्तरच्या दशकात आपण संकरित बीज आणि रासायनिक खते वापरून उत्पादकता वाढवली होती. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली का? ती सुधारली नसेल तर त्याचे आधी कारणं शोधली पाहिजेत.
5) केंद्रीय मंत्री एक विधान करतात पण त्याच्या कारणांचा वेध घेत नाहीत. अमेरिका आणि भारताच्या शेतीची तुलना करीत नाहीत, ही चालाखी समजून घेतली पाहिजे
6) अमेरिकेत सीलिंगचा कायदा आहे का? नाही. त्यामुळे तेथे कंपन्या शेती करतात. भारतात सीलिंग असल्यामुळे शेती करणाऱ्या कंपन्याच तयार झाल्या नाहीत. शेत जमिनीचे तुकडे होत गेले. आज 80 टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प शेतकरी आहेत. भारतात शेतीच्या कंपन्या झाल्या असत्या तर चित्र वेगळे राहिले असते. सरकारला जी. एम. बियाण्यांवर बंदी घालण्याची हिंमतच झाली नसती!
7) अमेरिकेत जी एम बियाण्यांच्या वापरावर बंदी नाही. भारतात बंदी आहे. कापसात बीटी वापरायलाही बंदी होती, शेतकऱ्यांनीच मोडली. सरकारला मान्यता द्यावी लागली. त्यानंतर कापूस उत्पादनात भारत शिखरावर पोचला. जेथे आधुनिक तंत्रज्ञान येते, तेथे उत्पादकता वाढतेच.
8) उत्पादन वाढले म्हणून उत्पन्न वाढत नाही, हा अनुभव कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे. भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात ‘आवश्यक वस्तू कायदा’ हा सर्वात मोठा अडसर आहे. तो कायदा केंद्र सरकार रद्द करू शकते
9) केंद्रीय मंत्री महोदय, तुमच्या सरकारला सीलिंग, आवश्यक वस्तू, जीएम बंदी हे कायदे रद्द करायला भाग पाडा मग तुम्हाला दिसून येईल भारतीय शेतकरी काय चमत्कार करू शकतो, असेही अमर हबीब यांनी सुनावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *