स्वातंत्र्यानंतर भारत घडविणारे तीन महत्त्वाचे ब्रँड्स

1. गोदरेज 2. सिप्ला 3. अमूल

• महात्मा गांधी यांच्या “स्वदेशी” म्हणजेच चळवळीने प्रेरित पहिला ‘मेक इन इंडिया’ प्रोजेक्ट म्हणजे अर्देशीर गोदरेज या पारशी माणसाची कंपनी.

• “ब्रिटिश पेटंट लॉ” आणि परदेशी औषधी कंपन्यांच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि महात्मा गांधी यांच्या विनंतीतून डॉ. युसुफ हमीद या मुस्लिम तरुणाने नावारूपाला आणली ती केमिकल इंडस्ट्रिअल अँड फार्मास्युटिकल लॅबोरेटरी म्हणजेच C.I.P.La

• गुजरातेत शेतकऱ्यांना ब्रिटिश सरकार सक्तीने पॉलसन डेअरीला किरकोळ भावात दूध घालायला भाग पाडत होते. त्याकाळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक सहकारी डेअरी सुरू केली. त्याला पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातून डॉ. वर्गीस कुरियन या ख्रिश्चन माणसाने आकार दिला आणि अमूल ब्रँड जन्मास आला. ऑपरेशन फ्लड मधून देशात पांढरी क्रांती झाली आणि भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला.

अशी आहे ही माझ्या, तुमच्या-आमच्या सर्वांच्या भारताची तिरंगा स्टोरी. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेतून इथे नवा भारत घडविणारी औद्योगिक क्रांती घडत गेली. अर्देशीर गोदरेज, डॉ. युसुफ अहमद आणि डॉ. वर्गीय कुरियन हे ध्येयवेडे, देशभक्त म्हणजे धर्म, जात, पंथ, पक्ष यापलीकडे बदलत्या स्वतंत्र भारताला आकार देणारी तीन प्रातिनिधिक उदाहरणे – एक पारशी, दुसरा मुस्लिम आणि तिसरा ख्रिश्चन!

Make in India हेही गांधी-नेहरू-पटेल यांनी रुजवलेले जुनेच रोपटे! त्यामुळे फक्त हिंदूंचा भारत किंवा फक्त हिंदूंनी भारत घडविला, असे तुणतुणे कुणी वाजवू लागले, की त्याला जरूर आठवण करून द्या – त्याच्या लग्नातील गिफ्ट असलेली अलमारी गोदरेज यांची, त्याने खाल्लेले B12, अँटी मलेरिया टॅब डॉ. युसुफ यांचे आणि त्याच्या घरी पोहोचलेले, त्याने प्यायलेले दूध हे डॉ. कुरियन यांचे. ज्यांनी भारताच्या चार पिढ्या घडविल्या, माणसे घडविली, देश घडविला अशी ही भारताची तिरंगा स्टोरी! त्यामुळे या भारताला धर्माच्या कोंदणात बांधण्याचा प्रयत्न करणे, हा निव्वळ मूर्खपणा.
कुणी स्वतः ढोल बजावले नाही, आपणच आपली पाठ थोपटून घेतली नाही, म्हणून या देशात काही Make in India स्टोरी नव्हती का? हा भारत गेली 75 वर्षे, त्याही आधीपासून निरंतर घडत आहे, आकार घेत आहे, बलशाली होत आहे. मात्र, त्याचा गाभा सर्वधर्मसमभाव हाच राहिला आहे. सबका साथ सबका विकास ही इथे निव्वळ आजची घोषणा नाही, तर गेल्या 75 वर्षांत समाजाची जगण्याची रीत आहे.

नव्या पिढीने भारत समजून घ्यायला हवा, त्याचा खरा इतिहास समजून घ्यायला हवा. जे सातत्याने दाखवले जातेय, जे समोर मांडले जातेय, तेच सत्य नाही. या देशाचा खरा इतिहास समजून घ्या. हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांचा भारत आहे. इथे प्रत्येकाच्या धर्माचा मान-सन्मान आहे. तरीही इथे धर्माने काही चालत नाही. धर्माच्या मायाजालात कुणी फसवू पाहत असेल तर मुळीच फसू नका. (यात काही नेत्यांचे उल्लेख आलेले नसतील, काही उद्योगांची नावे आलेली नसतील म्हणून त्यांचे स्वातंत्र्य चळवळ, नवा भारत घडविण्यातील योगदान कमी नाही. हिंदू उद्योजकांनीही या देशाच्या आर्थिक, औद्योगिक नवनिर्माणाला आकार दिलाय. मात्र, या लेखाचा संदर्भ आणि आशयगाभा धर्मातीत आहे, तो ध्यानात घ्यावा.)

-विक्रांत पाटील
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत
Vikrant@Journalist.Com
08007006862 (WA फक्त)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *