ऑनलाइन पत्रकारितेमुळे माध्यमांचे लोकशाहीकरण पण विकृतीकरणाचे आव्हान

मोहनलाल बियाणी व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांचे प्रतिपादन

औरंगाबाद: ऑनलाइन पत्रकारितेमुळे माध्यम जगत उत्क्रांतीच्या टप्प्यावर आहे. या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमुळे बदलणाऱ्या वातावरणाशी जे जुळवून घेतील, तेच टिकतील. अन्यथा डायनासोरच्या वाटेने जातील, असा इशारा न्यूजटाऊनचे मुख्य संपादक सुरेश पाटील यांनी दिला. ऑनलाइन पत्रकारितेमुळे माध्यमांचे लोकशाहीकरण झाले हे खरे असले तरी फेकन्यूजमुळे त्याच माध्यमाचे विकृतीकरण होण्याचाही धोका आहे, हे आव्हान आपण कसे पेलणार?, यावरच या माध्यमाचे भवितव्य अवलंबून असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून दैनिक मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलाल बियाणी यांच्या स्मरणार्थ मासिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या ‌व्याख्यानमालेत ‘ऑनलाइन पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी सुरुवातीला स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच सुरेश पाटील यांचा सत्कार मराठवाडा साथीचे संपादक जगदीश बियाणी यांनी केला.

यावेळी पुढे बोलताना सुरेश पाटील म्हणाले की, १९९३ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या प्रारंभिक न्यूज पोर्टलच्या रुपाने ऑनलाइन पत्रकारितेची बिजे रोवली. गेल्या २८-३० वर्षात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या सातत्यपूर्ण बदलांनी ऑनलाइन पत्रकारितेची धाटणी, स्वरुप, प्रक्रिया बदलली. त्यामुळे माध्यम जगत उत्क्रांतीच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे. उत्क्रांत होणे आणि नामशेष होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही उत्क्रांतीमध्ये अनेक विद्यमान प्रजाती नामशेष होतात. काही प्रजाती म्यूटेट होऊन नव्या स्वरुपात आपले अस्तित्व निर्माण करतात तर काही नव्या प्रजाती जन्माला येतात. तसेच काहीसे माध्यम जगतातही घडू पहात आहे, असे पाटील म्हणाले.

डायनासोरचे नाहीसे होणे हे उत्क्रांतीमध्ये नामशेष होण्याचे पृथ्वीवरील प्रसिद्ध उदाहरण आहे. १६० दशलक्ष अधिराज्य गाजवणारी डायनासोरची प्रजाती ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाली. पृथ्वीवर एक लघुग्रह कोसळला आणि त्यामुळे बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मेंदू आणि मेंदूची कार्ये विकसित करण्यात डायनासोर अपयशी ठरला. आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्याचा त्याच्यावर एवढा दबाव वाढला की तो सहन न होऊन डायनासोर आकुंचन पावले आणि नामशेष झाले. बदलत्या परिस्थितीशी ज्याला जुळवून घेणे जमते तेच एक तर जुन्या स्वरुपात तग धरून राहतात किंवा म्यूटेट होऊन नव्या स्वरुपात अस्तित्व निर्माण करतात. पण ज्यांना या बदलांशी जुळवून घेणे जमत नाही, त्यांचे नामशेष होणे क्रमप्राप्त आहे, असे पाटील म्हणाले.

डायनासोरच्या बाबतीत जे घडले तेच मीडियातील अनेक प्रजातींच्या बाबतीत घडते की काय? अशी शक्यता दिसू लागली आहे. पारंपरिक पत्रकारिता विशेषतः प्रिंट मीडियाने तब्बल ३०० वर्षे जगावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, ऑनलाइन पत्रकारितेने प्रिंट मीडियासमोर अनेक आव्हाने आणि धोके निर्माण केले आहेत. या बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊन नवीन कार्य पद्धती विकसित करण्यात प्रिंट मीडियाला अनेक अडचणी येत आहेत. एकीकडे नफ्यात झालेली घट आणि दुसरीकडे स्पर्धात्मक वातावरण अशा दुहेरी तणावाचा सामना पारंपरिक पत्रकारितेला करावा लागत आहे. त्यामुळे पारंपरिक मीडिया टिकेल की डायनासोरच्या मार्गाने जाईल?, हा खरा प्रश्न आहे, असे पाटील म्हणाले.

या बदलत्या वातावरणात प्रिंट मीडिया विशेषतः वृत्तपत्रे आज आहेत त्या स्वरुपात कायम राहू शकत नाहीत, हे स्पष्ट आहे. त्यांना आपली नवीन कार्य पद्धती विकसित करावी लागेल. तसे काही संकेतही मिळत आहेत. पत्रकारिता बदलत आहे. नवीन गुणधर्म आणि वैशिष्ट्ये स्वीकारू लागली आहे. आपल्या बलस्थानांचा विस्तार करू लागली आहे. वस्तुनिष्ठ वार्तांकन, माहितीपूर्ण विश्लेषण आणि मत व टिप्पणी हे पत्रकारितेचे मुख्य गुणधर्म आणि वैशिष्ट्ये तिने आपल्या वारसाकडे म्हणजेच ऑनलाइन पत्रकारितेला प्रदान केली आहेत. ही गुणधर्म आणि वैशिष्ट्येच ऑनलाइन पत्रकारितेचा मूलाधार बनली आहेत. त्यामुळे ऑनलाइन मीडिया हाच आता मेनस्ट्रीम मीडिया बनू पहात आहे, असेही पाटील म्हणाले.

ऑनलाइन पत्रकारिता हा माध्यमांच्या लोकशाहीकरणाचा धाडसी प्रयत्न आहे. परंतु ऑनलाइन पत्रकारितेच्या ग्राहकांचे अलगोरिदमच्या माध्यमातून वर्गीकरण केले जाऊ लागले आहे. यूजर जे सर्च करतात, तेच त्यांना दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अनेक महत्वाच्या बातम्या तुम्हाला दाखवल्याच जात नाहीत. अलगोरिदम ही तांत्रिक क्रांती असली तरी त्यामुळे माहिती वंचितांचा एक मोठा वर्ग निर्माण केला जात आहे. हे एक मोठे आव्हान आहे. ऑनलाइन पत्रकारितेच्या दुनियेकडे लोकशाही दुनिया म्हणून पाहिले जात आहे. परंतु सामूहिक कृती घडली तरच लोकशाहीची प्रक्रिया घडते. त्यामुळे ऑनलाइन पत्रकारितेत किमान मुद्यांवर तरी कलेक्टिव्ह न्यूज कंझम्पशन होणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.

फेक न्यूजची विकृती ऑनलाइन पत्रकारितेमध्ये वेगाने फोफावू लागली आहे. क्लिक वॉरमुळे सनसनाटी निर्माण करणाऱ्या बातम्या पोस्ट करण्याकडे कल वाढताना दिसू लागला आहे. भारतातील ५७ टक्के लोकांना त्यांच्याकडे ऑनलाइन माध्यमातून आलेली बातमी खरी आहे की खोटी याची चिंता सतावते आहे. फेक न्यूज हा ऑनलाइन पत्रकारितेच्या सुवर्णकाळाकडील वाटचालीतील मोठा अडथळा असून तो दूर कसा करायचा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. तसे झाले नाही तर हे गतीचक्र उलटे फिरण्याचा धोका आहे, असेही शेवटी सुरेश पाटील म्हणाले.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, महानगर प्रमुख अनिल सावंत, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, उपाध्यक्ष छबुराव ताके, आधुनिक केसरीचे व्यवस्थापकीय संपादक संजय व्यापारी, मराठवाडा साथीचे युनिट हेड विलास जैन, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत सुर्यतळे, पत्रकार जितेंद्र भवरे, शोएब दौलताबादे, सचिन उबाळे, अनिल कुलथे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *