पुणे: गांधीजींनी भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी केली. त्यासाठी ते जगले आणि बलिदानही केले. त्यांच्या राष्ट्रवादात सहिष्णुता, शांततेला स्थान होते. गांधी विचार हा युग विचार असून तो सर्वत्र अस्तित्वात आहे. हे अस्तित्व संपवता येणार नाही. आजही अन्याय, अत्याचार विरुद्ध दाद मागताना गांधी मार्ग वापरावा लागतो. सध्याचे केंद्र सरकार गांधी मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना दाद देत नाही. ते जनतेप्रती उत्तरदायित्व मानत नाही. राजीव गांधी यांची पदयात्रा हा देखील गांधी मार्गच आहे, असे मत अ.भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
डॉ.हनुमंत कुरकुटे लिखित ‘गांधी विचारांची प्रासंगिकता, संदर्भ :हिंद स्वराज्य ‘ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते गांधीभवन येथे सोमवार, १२ सप्टेंबर रोजी झाले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र स्मारक गांधी निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, सौ. नीलम पंडित, युवक क्रांती दलाचे राज्य कार्यवाह संदीप बर्वे हे उपस्थित होते. डॉ.हनुमंत कुरकुटे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
पुढे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘ भारतात आज धार्मिक फूट पाडली जात आहे. शोषण होत आहे, ध्रुवीकरण केले जात आहे. गांधीना हा देश, जग, समस्या, त्यावरील उत्तरे जितकी कळली होती, तितकी कोणाला कळली नाहीत. महाराष्ट्रात गांधी यांचा दुस्वास निर्माण झाला. महाराष्ट्र त्यामुळे देशात शरमिंदा आहे. गांधी विचाराची उपेक्षा होता कामा नये.
द्वेषाला प्रेमाने जिंकता येते, हेच हिंद स्वराज्य ‘ या गांधीजींच्या पुस्तकात सांगीतले आहे. धर्मनिरपेक्षता, सर्वोदय, नैतीक उत्क्रांती, यंत्र संस्कृतीच्या मर्यादा हे मुद्दे या पुस्तकात गांधीजीनी सांगीतले आहेत.१९८० नंतर पैशाचे महत्व वाढून माणसाचे महत्व कमी झाले. या काळात गांधी विचाराचे महत्व पुन्हा कळू लागले. जागतिकीकरणाचे तोटे सर्वांना कळू लागले आहेत. आर्थिक साम्राज्यवादाविरुद्ध गांधी विचार उपयोगी ठरेल, असेही देशमुख यांनी सांगितले.
गांधींचा देश ही जगात भारताची ओळख: डॉ.कुमार सप्तर्षी
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘गांधी विचाराचे औत्सुक्य जगात वाढत आहे. गांधींचा देश ही जगात भारताची ओळख आहे. आता नकली गांधी संघपरिवाराकडून केले जात आहेत. गांधीजींनी इथल्या समाजरचनेवरचा जालीम उपाय ‘हिंद स्वराज्य’ पुस्तकात सांगीतला. काळाला आवश्यक बीज विचार या पुस्तकाने दिला. वर्चस्ववादी विचाराने मानवजातीचा विनाश होईल, हे गांधीजी जाणत होते. भारताकडून जगाला समस्यांची उत्तरे हवी आहेत. ती गांधी विचारात आहेत. गांधी विचार हे कालातीत आहेत. तेच टिकून राहतील. गांधी, संविधान मानत नाही, तो राष्ट्रभक्तच नाही. आताचे हिंदुत्वाचे वारे हा बहुसंख्यांकवाद आहे. तो अधिक काळ टिकणार नाही.