तीन प्रकल्प महाराष्ट्रातून गेले: आदित्य ठाकरे

तुम्ही खोके घेऊन ओके झालात पण तरुणांच्या रोजगाराचं काय?; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

पुणे: युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचं सांगितलं.

आंदोलनात शिवसेनेच्या हजारो कार्यकत्यांनी हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. तुम्ही खोके घेऊन तुम्ही एकदम ओके झालात, पण आमच्या रोजगाराचं काय, असा प्रश्न तरुणांचा आहे. फक्त शिवसेनेच्या नाही, तर महाराष्ट्रातील तरुणांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मोठा खुलासा केला. वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प जो महाराष्ट्रात होणार होता तो आता महाराष्ट्राबाहेर गेल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय, याकडे आहे. पण राज्यात उद्योग कोणते येत आहेत, गुंतवणूक कोण घेऊन येतंय, याकडे कुणाचंच लक्ष नाही आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. जो प्रकल्प महाराष्ट्रात येणं गरजेचं होतं. जो येऊ शकत होता. तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रात येऊ शकणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. महाराष्ट्रातून एक-एक प्रकल्प बाहेर जात आहेत. शंभर टक्के तळेगावात येणारा प्रकल्प सरकार बदलल्यानंतर पळवलाच कसा? असा सवाल करत महाविकास आघाडी सरकार असतं तर प्रकल्प गेलाच नसता, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वतः साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला  एकदाही गेले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *