पंतप्रधानांनी साधला रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद
अलिबाग: नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र.8 या शाळेतील विद्यार्थ्यांशी दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारतीय तंत्रज्ञान आपल्या देशाला “ग्लोबल लीडर” बनवेल, असा विश्वास व्यक्त करून 5 जी इंटरनेट सेवेचे महत्त्व सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी हात हलवून आणि उभे राहून पंतप्रधानांना अभिवादन केले. मुख्यमंत्री आपल्यासारखेच बेंचवर बसल्याचे पाहून विद्यार्थ्यांना अप्रूप वाटले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त (अ.का) तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, गृहरक्षक- नागरी संरक्षण दल अपर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक गणेश पाटील, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपिन कुमार सिंह, आयुक्त डॉ.जय जाधव, उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, आदी उपस्थित होते.
5 जी इंटरनेट सेवेच्या पहिल्या टप्प्यात ही सेवा मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनऊ,गांधीनगर, अहमदाबाद व जामनगर या शहरांमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशात हे 5 जी इंटरनेटचे जाळे विस्तारत जाणार आहे.