अंबाजोगाई: बुद्धिस्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने बुधवार, 5 ऑक्टोबर रोजी नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे भव्य धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धम्म महोत्सवात आदरणीय भदन्त धम्मसार (किल्लारी, जि.लातूर) यांचे धम्मदेसना – धम्मप्रवचन झाले. तर उद्घाटक म्हणून ॲड.संघराज रूपवते (उच्च न्यायालय, मुंबई) आणि समारोप सत्रात आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. धम्म महोत्सव उद्घाटन, धम्म प्रवचन, “स्वरविहार” हा बुद्ध व भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आणि समारोप अशा चार सत्रात आयोजित करण्यात आला होता. धम्म महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बुधवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत नियोजित ‘विश्वशांती महाविहार’, ‘लुंबिनी पार्क’, मांडवा रोड, अंबाजोगाई (जि.बीड) येथे हा महोत्सव साजरा करण्यात आला. प्रारंभी धम्म ध्वजारोहण आणि तथागत गौतम बुद्ध व बोधीसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. ॲड.संघराज रूपवते (उच्च न्यायालय, मुंबई.) यांचे हस्ते धम्म महोत्सवाचे उद्घाटन झाले. धम्म महोत्सवाचे दुसरे सत्र हे धम्म प्रवचनाचे होते, या वेळेस भदन्त धम्मसार (किल्लारी, जि.लातूर) यांनी धम्मदेसना- धम्मप्रवचन देताना अत्यंत मौलिक विचार मांडले ते म्हणाले की, बोधीसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म कसा स्वीकारला या बाबतची पार्श्वभूमी सांगितली. कर्मकांड, जुन्या परंपरा सोडून धम्माचे आचरण करा, डोळस बना, अंधश्रद्धा सोडा, आपला इतिहास लक्षात ठेवून भविष्यातील वाटचाल करा, भारत बौद्धमय करा, दान करा असे आवाहन भदन्त धम्मसार यांनी केले.

प्रारंभी उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, आरपीआय-ए), प्रा.सुकुमार कांबळे (राष्ट्रीय अध्यक्ष- डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया), माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. एस.के. जोगदंड, ॲड. अनंतराव जगतकर, एस.के. चेले, विश्वास बिराजदार या मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती. या वेळेस प्रा.सुकुमार कांबळे आणि अजिंक्य चांदणे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत बौद्ध धम्माचा स्वीकार केला असल्याने त्यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना ॲड. संघराज रूपवते (उच्च न्यायालय, मुंबई) यांनी अत्यंत मौलिक विचार मांडले, ते म्हणाले की, आता आंबेडकरी कार्यकर्त्यांनीच बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यावी, कारण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्यावर भारताची लोकशाही, संविधान आणि हा देश वाचविण्याची मोठी जबाबदारी आहे याचा विसर पडू देऊ नका. प्रा.सुकुमार कांबळे यांनीही भारत बौद्धमय करण्यासाठी धम्म स्वीकारा, आत्मसात करा, कागदोपत्री बौद्ध झाले पाहिजे, आजच्या तरूणांनी बुध्द विहारात गेले पाहिजे, निर्व्यसनी राहिले पाहिजे असे विचार मांडले. तर अजिंक्य चांदणे यांनी ही यावेळेस सांगितले की, आपणास बुद्धांचे डोळस अनुयायी व्हायचे आहे, धम्माचा विचार समजून घेवून जीवनात पुढे जायचे आहे.
यावेळेस माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा. एस.के. जोगदंड, ॲड.अनंतराव जगतकर या मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. ॲड. सुनील सौंदरमल यांचे मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देवून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. तर अध्यक्षीय समारोप माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केला. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ.सर्जेराव काशिद यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ.शंकर वाघमारे यांनी मानले. तिसऱ्या सत्रात संगीततज्ज्ञ प्रा.राजकुमार ठोके, प्रा.राहूल सुरवसे, प्रा.रमेश सरवदे, संबोधी माने, संघमित्रा माने व संचाने “स्वरविहार” हा बुद्ध व भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. चौथ्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी आमदार नमिता मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ) तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेंद्र काळे (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), माजी नगराध्यक्ष महादू मस्के, कबीरानंद कांबळे (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगर), माजी जिल्हा परिषद सदस्य पंडितराव जोगदंड, सौ.जोगदंड हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.नरेंद्र काळे यांनी संयोजक यांचे कौतुक केले. ‘विश्वशांती महाविहार’ या करिता सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली.
अध्यक्षीय समारोप करताना आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, आपल्या सर्वांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा सार्थ अभिमान आहे, तथागत गौतम बुद्ध यांनी आपणांस मानवता, शांती, करूणा यांची शिकवण दिली. तथागत गौतम बुद्ध आणि बोधीसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आयुष्यात वाटचाल करावी, ‘विश्वशांती महाविहार’ या करिता आमदार फंडातून सभागृह आणि आवश्यक ती सर्वोतोपरी मदत व सहकार्य केले जाईल असे आमदार मुंदडा म्हणाल्या. यावेळेस धम्म महोत्सवाचे आयोजना करिता पुढाकार घेणारे व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रा. डी.जी. धाकडे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांचे आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ.राहूल धाकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.कमलाकर कांबळे यांनी मानले.