अंबाजोगाई: पत्रकार, शिक्षक आणि डॉक्टर यांनी समाजाचा आरसा म्हणून काम करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले.
पट्टीवडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. भानुदास जाधव गुरुजी स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात नंदकिशोर मुंदडा बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक खरात, अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब लव्हारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पट्टीवडगाव येथील स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने सुदर्शन रापतवार (पत्रकारिता), डॉ. तुकाराम नेहरकर (वैद्यकीय) महेश्वर नरवणे व सौ. शकुंतला पेद्दे (शिक्षण) या मान्यवरांना कै. भानुदास जाधव स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात नंदकिशोर मुंदडा पुढे म्हणाले की, सुदढ समाज निर्मितीसाठी पत्रकार, डॉक्टर आणि शिक्षकांचे योगदान मोठे असून त्यांनी आरसा जसे आपल्या चेहऱ्यावरील वैगुण्य दाखवून देतो त्याप्रमाणे समाजातील वैगुण्य दाखवून देण्याचे काम या तीन घटकांनी करावे असे आवाहन केले.
आपल्या विस्तारीत भाषणात नंदकिशोर मुंदडा यांनी पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त सुदर्शन रापतवार यांनी केलेल्या गेल्या चाळीस वर्षापासून च्या पत्रकारितेचा गौरव केला. सुदर्शन रापतवार यांनी समाजाभिमुख पत्रकारिता करीत असता आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेवून डॉ. तुकाराम नेहरकर यांचा गौरव करतांना कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाचा गौरव केला तर शिक्षण क्षेत्रात महेश्वर नरवणे, सौ. शकुंतला पेद्दे आणि रघुनाथ इंगळे यांनी चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. भानुदास जाधव गुरुजी स्मृती पुरस्काराचा गौरवाने उल्लेख करीत ज्य गुरुजींच्या नावे हा पुरस्कार दिला जातो त्या गुरुजींच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व मुलांना आणि मुलींना उच्च शिक्षण देवून त्यांना स्वतः घ्या पायावर सशक्तपणे उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आदर्श शिक्षक नागनाथ बडे, दिलीप मुंडे, दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी रमाकांत पाटील, डॉ. प्रदीप फड, पत्रकार अरुण गीत्ते, रामदास दिवटे, दगडू साहेब तारे यांच्यासह पट्टीवडगाव येथील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोतिबा जाधव यांनी केले तर स्त्रसंचलन आलापुरे गुरुजी यांनी केले. प्रमुख अतिथी व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परीचय सौ. हेमा चिरकुले यांनी करुन दिला. तर आभार सौ. उषा लव्हारे यांनी मानले.
कै. सुनील मुथा यांना पुरस्कार समर्पित: स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणाऱ्या कै. भानुदास जाधव गुरुजी आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी आपल्या भाषणात दोन दिवसांपूर्वी -हदयविकाराने दुखः द निधन झालेले आपले मित्र कै. सुनील मुथा यांच्या आठवणींना उजाळा देत हा पुरस्कार त्यांना समर्पित करीत असल्याचे जाहीर केले.