मुंबई: खासगी नोकरीत कितीही गलेलठ्ठ पगार असली तरी आजही सरकारी नोकरीची क्रेझ कायम आहे, म्हणूनच की काय आजही युवक सरकारी नोकरीलाच प्राधान्य देतात. अशाच घरोघरी सरकारी नोकरदार असलेल्या भूम तालुक्यातील अरसोली या छोट्याशा गावातील सनदी (आयएएस) अधिकारी या पदापर्यंत पोहोचलेल्या शिवानंद टाकसाळे टाकसाळे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. नुकताच त्यांना एमसीएम टिव्ही व साईसागर एन्टरटेन्मेंट, नवी मुंबईच्या वतीने ‘स्टार महाराष्ट्राचे’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांची प्रशासनातील कारकिर्द व अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा हा प्रवास थक्क करणारा असाच आहे.
शिवानंद टाकसाळे यांची 1994 ला राज्यसेवेत (एमपीएससी) उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांना आता भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस हे केडर मिळाले असून, त्यांची परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते महात्मा फुले जनआरोग्य विभाग मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. श्री. टाकसाळे यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे भूम व वाशी (जि.उस्मानाबाद) येथे झाले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण अंबाजोगाई येथील एसआरटी महाविद्यालयात झाले. शिक्षणानंतर त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे जवळपास दोन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. दरम्यान, त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली व एमपीएससीतून त्यांची 1994 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली.
श्री. टाकसाळे यांनी विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, धानोरा येथे विविध पदावर काम केले आहे. त्यांना बाबा आमटे यांचाही सहवास लाभला. त्यांनी बाबा आमटे यांच्याबरोबर आनंदवनातही काम केले आहे. नांदेड येथे उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी रोजगार हमी योजनेत महत्वपूर्ण असे योगदान दिले. त्यांनी जवळपास 40 हजार मजुरांना काम मिळवून दिले. बीड येथे असताना जिल्ह्यातील जवळपास 117 तलावातील गाळ काढून पाणीपातळी वाढवण्यासाठीचे काम केले. तसेच हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना दिल्याने त्यांनी हा गाळ आपल्या शेतात टाकल्याने तेथील जमीन सुपीक होऊन तिचा पोत चांगला झाला, हा दुहेरी फायदा झाला. कोरोनाच्या काळात त्यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची नियुक्ती परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली. परभणी येथे असताना त्यांनी तेथे कोरोना लसीकरणाचे काम जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने राबविले. परभणीहून त्यांची बदली मुंबईला महात्मा फुले जनआरोग्य विभागात झाली आहे. सध्या ते तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.