१० नोव्हेंबरला नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा
नांदेड: कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला सायंकाळी नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि लोकशाही कायम टिकवण्यासाठी निघालेल्या पदयात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुलं-मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग यामध्येआहे. बेरोजगारी, महागाई, दडपशाही सारख्या मुद्यांवर लोक स्वतःहून आपल्या व्यथा राहुल गांधी यांच्याकडे मांडत आहेत, हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये यात्रेबद्दल प्रचंड, उत्सुकता, कुतुहल, आकर्षण आहे. लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. या यात्रेसाठी ‘मी पण चालणार’ हे घोषवाक्य करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील यात्रेबाबत माहिती देण्यासाठी ९९३९९३२२३३ हा मोबाईल क्र. २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात आला आहे. या मोबाईल क्रमांकावर फक्त नांदेड जिल्ह्यातील यात्रेबाबत माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे एलईडी व्हॅन्स, होर्डिंग्स, सोशल मीडिया अशा सर्व माध्यमातून भारत जोडो यात्रेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नसून, एक लोकचळवळ बनली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल अशा राजकीय पक्षांसह, लोकचळवळी, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, विचारवंत अशा अनेक घटकांकडून भारत जोडोला यात्रेला समर्थन मिळाले आहे. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रवासादरम्यान वरील सर्व घटकातील नेते, प्रमुख मंडळी विविध ठिकाणी सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातसुद्धा अनेक मंडळी सहभागी होणार आहेत.
भारत जोडो यात्रेचे देगलूर आगमन ७ नोव्हेंबरला निश्चित आहे. सायंकाळच्या सुमारास ते तेलंगणातून प्रवेश करतील. देगलूर नगर परिषदेशेजारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर त्यांचे स्वागत होणार आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांचे देगलूर, शंकरनगर रामतीर्थ, वझरगा फाटा आणि पिंपळगाव महादेव असे चार मुक्काम असतील. दरम्यान, भोपाळा (८ नोव्हेंबर) व कृष्णूर एमआयडीसीला (९ नोव्हेंबर) कॉर्नर मिटिंग असेल. १० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाक्यावरून पदयात्रा प्रारंभ. बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुथा चौक वजिराबाद, कलामंदीर, शिवाजीनगर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा आणि १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नवा मोंढा मैदान, नांदेड जाहीर सभा होणार आहे.