शेतकऱ्याचे वेठबिगारीकरण मानहानीकारक: संजीवनी तडेगावकर

नायगाव/नांदेड (भगवानराव पाटील भिलवंडे साहित्य नगरी): अलीकडे गावात खूप बदल झालेत, स्वभावाप्रमाणेच गाव आणि नात्या-गोत्यांचा चेहरा- मोहराही बदलला, पाझरणारी ओल आटून मनात, शिवारात एक प्रकारे रूक्ष कोरडेपणा आला आहे. कुचकामी शिक्षणातून निर्माण झालेल्या बेरोजगारीमुळे वादाची जागा निराशावादाने कधीच घेतली, एकेकाळी सुकाळ असणाऱ्या गावावर आता सतत कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाची चिंतातूर काळी छाया पसरली असून सरकारचा निष्ठूर कारभार आणि निर्दयी सावकारांच्या तगाद्याने वेठीस धरलेला मातीचा माणूस ढेकळासारखा विरून चालला आहे. अशी खंत व्यक्त करत एकेकाळी राजा माणूस म्हणून असलेली शेतकऱ्यांची ओळख पुसून वेठबिगार ही नवी होत असलेली ओळख समाज आणि देशासाठी मानहानीकारक आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा आणि श्री दत्तात्रय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदित्य गार्डन, नरसी फाटा (ता.नायगाव) येथील भगवानराव पाटील भिलवंडे साहित्य नगरीत शनिवारी 17 वे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन आंबिका शुगर्स चे संचालक राजेश देशमुख कुटूंरकर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजीवनी तडेगावकर होत्या. प्रमोद देशमुख, मारोतराव कवळे, डॉ. वृषाली किन्हाळकर, संजय कुलकर्णी, बाबू बिरादार, पांडुरंग देशमुख गोरठेकर,  प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, धनंजय गुडसूरकर, संभाजी राजे बराटे, ॲड. मनीष खांडिल, विलास सिंदगीकर, संयोजक दिगंबर कदम, स्वागताध्यक्ष प्रकाशदादा पाटील भिलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकरी कुटुंबातील बालपण, लिखाण प्रवास उलगडतांना डॉ. संजीवनी तडेगावकर पुढे म्हणाल्या, स्वतःच्या वृत्तीचा शोध हा संवादाची भूक वाढवणारा, अस्वस्थ करणारा असतो. म्हणूनच कवी, लेखक, कलावंत अनिष्ट चालीरिती, दांभिकता, समाजातील व्यंगावर बोट ठेवून साहित्य कलेच्या माध्यमातून दिशादर्शनाचे काम करत असतात. असे त्यांनी नमूद केले.

नवीन प्रवाहामुळे आभ्यासकांनी केलेली विभागणी समाजाच्या मानसिकतेत फूट पाडण्यास कारणीभूत ठरली. यातून साहित्याची वर्गवारी, गटागटाचे राजकारण, कंपूशाही निर्माण झाली. एकमेकांचे वाचणे, चर्चा करणे, मत मांडणे, या वांड्:मयीन आनंदाचे पार वाटोळे झाले. तसेच लेखनातील चांगले वाईट, कसदारपणा, दर्जा याचा विचार न करता मराठी साहित्याला आलेली ‘आपलेपणाची’ बाधा दुर्दैवी असल्याची  खंतही संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केली.

भक्ती काळापासून स्त्रीयांच्या लिखाणाचा आढावा घेतांना प्रवचन, कथा, कीर्तनांतून स्त्रीयांचे दु:ख, अन्यायाचे दैवतीकरण होतांना दिसते, जनाबाई, कान्होपात्रा पासून सुरू झालेला स्त्री कवितेचा सशक्त प्रवाह आजच्या कवयित्रींनी अधिक जोमदार पणे प्रवाहित केला आहे. असे संजीवनी तडेगावकर यांनी नमूद केले. तथापि 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांत केवळ पाच लेखिका अध्यक्ष झाल्या तर लोकसंवाद च्या 17 संमेलनांत चार लेखिकांना अध्यक्ष पदाचा बहुमान देऊन लोकसंवाद ने स्त्री- पुरूष समानता जोपासली असे डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी अधोरेखित केले.

प्रास्ताविकात संयोजक दिगंबर कदम यांनी असुविधेचे केंद्र असलेल्या खेडेगावातील व्यथेचे कथेतून शब्दांकन व्हावे अशी भूमिका स्पष्ट करत शिक्षीत पिढीला व्यक्त होण्यासाठी हक्काचे लोकसंवाद साहित्य संमेलन उदंड प्रतिसादाच्या बळावर तग धरून असल्याचे कदम यांनी सांगितले. सूत्रसंचालन भूषण पाराळकर यांनी केले तर प्रा. नारायण शिंदे यांनी आभार मानले. या वेळी ” संवेदना ” स्मरणिका, गोविंद कवळे रचित ‘फुंकर’ काव्यसंग्रहाचे विमोचन करण्यात आले.

प्रकट मुलाखत, कथाकथन, कवितेचा जागर: सकाळी ग्रंथ दिंडीने प्रारंभ झालेल्या लोकसंवाद साहित्य संमेलनात प्रकाशदादा पाटील भिलवंडे यांची ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी व प्रा. हेमंत पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली.  राम निकम (सेलू) यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन, प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कविसंमेलन, तसेच बापू दासरी यांच्या अध्यक्षतेखाली जागर कवितेचा अशा भरगच्च साहित्यिक उपक्रमांची दिवसभर रेलचेल होती. संमेलन स्थळी ग्रंथ, दुर्मिळ नाणे, साहित्यातील माणिक मोती, शिल्पकृतीचे प्रदर्शन,भरविण्यात आले.

विविध पुरस्कारांचे वितरण: जीवन गौरव, शैक्षणिक, सामाजिक, संगीत, काव्य, ग्रंथालय, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात  ॲड. बी. आर. भोसले यांना जीवन गौरव, शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल पी. जी. शिरपूरकर, केशव दादजवार, दिलीप सावंत, प्रा. अशोक थावरे ( संगीत), सौ. बालिका बरगळ (काव्य), सौ. संगीता झिंजूरके (काव्य व साहित्य), शिवाजी जोगदंड ( काव्य व सामाजिक), कुबेर राठोड (ग्रंथालय), गणेश शिंदे (पत्रकारिता) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *