# औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या शंभरीपार; संशयित मृत महिला कोरोना पॉझिटिव्ह, मृतांची संख्या एकूण 7.

 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज मंगळवारी एकूण 23 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची संख्या 105 झालेली आहे. ज्यामध्ये मिनी घाटीत 68 नवीन कोरोनाबाधित रुग्ण, जलाल कॉलनीतील अन्य एक जुने 75 वर्षीय पुरूष जुने रुग्ण असे एकूण 69 कोरोनाबाधित रुग्ण, घाटीतील सात रुग्ण असे एकूण 76 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आजच्या मृत रुग्णासह आतापर्यंत सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. 23 रूग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

मिनी घाटीत आज दाखल रुग्ण किलेअर्क, असेफिया कॉलनी, भीमनगर, संजयनगर मुकुंदवाडी, पैठण गेट, बडिया तकिया मस्जिद, सिल्लेखाना, दौलताबाद या परिसरातील आहेत. यामधील संजय नगर येथील 60 वर्षीय महिला रुग्णास घाटी येथे संदर्भीत करण्यात आलेले आहे. आज घाटीत एकूण 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 37 जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेला आहे. 79 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. 38 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. 40 जणांचे येणे बाकी आहेत, असे मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

घाटीत मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, सात जणांवर उपचार सुरू:
घाटीत 28 रोजी रात्री 1.20 मिनिटांनी किलेअर्क येथील 77 वर्षीय महिला रुग्ण मृतावस्थेत दाखल करण्यात आल्या. त्या घरीच चक्कर येऊन 7.30 वाजता पडल्या होत्या. पूर्वीपासून मधुमेह, मानसिक आजारही त्यांना होते. हा रुग्ण दाखल झाल्यानंतर अपघात विभागात त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीसांगितले.

घाटीत 28 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 37 रुग्णांची तपासणी करण्यात आली. नऊ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. पाच जणांचे अहवाल येणे बाकी आहे. घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रुग्णालयात 32 रूग्ण भरती आहेत. तर आज संजयनगर, मुकुंदवाडी येथील 60 वर्षीय महिला रुग्णास घाटीमध्ये संदर्भीत करण्यात आल्याने घाटीच्या रुग्णालयात सात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील चोवीस तासात दोन कोरोना निगेटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दोन कोवीड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे, असेही डॉ. येळीकर यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *