पुण्यात शनिवार पासून दोन दिवसीय ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’

शोभा डे, अभिनेत्री सोनाली कलकर्णी, कव्वाली गायिका नूरन भगिनी, किशोर कदम यांच्यासह ६३ हून अधिक लेखक, कलाकार, गायक यांचा समावेश

पुणे: ‘दकनी अदब फाऊंडेशन’ तर्फे पुण्यात २६, २७ नोव्हेंबर रोजी   ‘डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कविता, नाट्य, चर्चा, संगीत अशा बहुरंगी, बहु आयामी कार्यक्रमांची रेलचेल या फेस्टीव्हलमध्ये आहे.फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. संचालक जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रविन्द्रपाल तोमर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. डेक्कन लिटरेचर  फेस्टिव्हल च्या मार्गदर्शक मोनिका सिंह यावेळी उपस्थित होत्या.

पुणेकर रसिकांना  भारतभरातील काव्य-संगीत-नाट्य-साहित्य विषयक दिग्गजांच्या आविष्कारांचा आनंद घेता यावा अशी दोन दिवसांच्या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषात विविध कार्यक्रम होणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे दोन्ही दिवस या फेस्टीव्हलचे विविध कार्यक्रम होतील. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पियुष मिश्रा, आयुक्त विक्रम कुमार, सुहास दिवसे, भारत सासणे, अतुल चोरडिया आणि मान्यवरांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन कार्यक्रम होईल. प्रसिद्ध लेखिका शोभा डे, पद्मश्री मालिनी अवस्थी (संगीत), अभिनेते मकरंद देशपांडे (अभिनय), अभिनेते-कवी पियुष मिश्रा (काव्य), रिचा अनिरुद्ध (सूत्रसंचालक), अभिनेत्री सोनाली कलकर्णी, कव्वाली गायिका नूरन भगिनी, वसीम बरेलवी, खुशबीर सिंह  शाद (कवी), कुंवर रणजित सिंह चौहान, किशोर कदम (सौमित्र), कविता काणे, सुधा मेनन असे ६३  हून अधिक कलाकार, साहित्यिक, गायक, पटकथा लेखक, कवी या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. मुक्ता बर्वे यांचा सहभाग असलेला ’प्रिय भाई,एक कविता हवी आहे’ हा अभिवाचनाचा प्रयोग देखील होणार आहे.

फेस्टीव्हल सर्वांसाठी खुला असला तरी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी
http://deccanlitfest.com//  संकेत स्थळावर करावी लागणार आहे, अशी माहिती जयराम कुलकर्णी यांनी दिली. यापूर्वी गुलाम मुस्तफा खान, दीप्ती नवल, आरती अंकलीकर-टिकेकर, कुमार विश्वास, सचिन खेडेकर, विशाल भारद्वाज, सुबोध भावे, निझामी बंधू अशा अनेक मान्यवरांनी या फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *